बेळगाव लाईव्ह : गेल्या वर्षभरापासून संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की नाही, याबाबत अजूनही साशंकता आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना यावेळीही मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेरबदलाबाबत भाजपच्या अंतर्गत सभागृहात कोणतीही चर्चा झाल्याचे निदर्शनात आलेले नाही.
अधिवेशन सुरु असताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सोमवारी संध्याकाळी अनपेक्षितपणे दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या दिल्ली वारीमुळे मंत्रिपदाच्या इच्छुकांना पुन्हा एकदा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी आशा होती. पण, नेहमीप्रमाणे, या आशेवर पाणी फेरले. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुढील स्तरावर नेण्यात आली आहे अशी माहिती भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिली. मात्र नक्की कधी मंत्री मंडळाचा विस्तार होणार याबाबत मात्र त्यांनी कोणतीच माहिती दिली नाही. राज्यातील भाजप सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर भाजप हायकमांडची भूमिका सकारात्मक आहे यामुळे हायकमांडचा निर्णय लवकरच जाहीर होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी यापूर्वीही अनेकदा दिल्लीला भेट दिली आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हायकमांडकडून कोणतीही सूचना आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. इतकेच नाही तर इतर नियुक्त्यांनाही मंजुरी मिळालेली नाही. मंत्रिमंडळात स्थान न मिळणाऱ्या आमदारांची मनधरणी करण्यासाठी वापरण्यात येणारे महामंडळाच्या नियुक्त्यांचे शास्त्रही सरकार वापरत नाही.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर पक्षांतर्गत मंत्रिपदावरून अनेकांचा दबाव आहे. अनेक ज्येष्ठ आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. विशेषतः रमेश जारकीहोळी आणि के. एस. ईश्वरप्पा यांनी उघडपणे याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सध्या कर्नाटक मंत्रिमंडळात ६ मंत्री पदे रिक्त आहेत. मात्र मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल याबाबत मात्र अद्याप चित्र अस्पष्ट आहे. मे २०२३ पर्यंत निवडणुका होणार आहेत, त्यामुळे एवढ्या कमी कालावधीत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की नाही, अशी शंका मंत्रिपदाच्या इच्छुकांना आहे.
ज्येष्ठ आमदार आणि मंत्रीपद गमावलेल्यांच्या दबावापुढे मुख्यमंत्री सहजासहजी निर्णय घेऊ शकत नाहीत. मात्र, अमित शहा यांच्या राज्य दौऱ्यात मुख्यमंत्री बोम्मई मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करतील, अशी आशा मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांची आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १२ जानेवारीला धारवाडमध्ये येणार आहेत. निदान यावेळी तरी मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करतील अशी आशा व्यक्त होत आहे.
विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. काही महिन्यांत निवडणुका होतील. मात्र यावेळी राज्यातील भाजप सरकारने मंत्रिमंडळ विस्तारासाठी पुढाकार घेतल्यास फायदा होण्यापेक्षा तोटाच होईल, असेहि मत व्यक्त केले जात आहे. मंत्रिपदापासून वंचित असलेले बंडखोरी करतील, अशी भीती आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात संघटित संघर्षासाठी मंत्रिमंडळ विस्तार अडचणीचा ठरेल, अशी भीती भाजप नेत्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.