सीमाभागातील मराठी भाषिकांना कधीतरी न्याय मिळेल अशी महाराष्ट्र एकीकरण समितीला कुठे ना कुठे दुर्दम्य आशा आहे. सीमा लढा यशस्वी करून दबलेल्या मराठी जनतेला मोकळा श्वास मिळवून देऊ हा आमचा विश्वास आहे. सद्य परिस्थितीत सीमाप्रश्नी महाराष्ट्राने आपली किंमत खणखणीत वाजवून दाखवली पाहिजे या मताचे आम्ही आहोत, असे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सांगितले.
आगामी मराठी भाषिकांच्या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दीपक दळवी बेळगाव लाईव्हशी बोलत होते. कर्नाटक सरकारच्या दादागिरीला विरोध दर्शविण्यासाठी येत्या 19 डिसेंबर रोजी मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आला आहे. हा जनतेचा निर्णय असून तो मी जाहीर करतोय. आपल्याला कोणाची सत्ता खेचून घ्यायची नाही. चार दिवसांपूर्वी निवडणुका झाल्या, प्रत्येकाला आपापले वेगवेगळे मुद्दे मांडता आले. त्यांना परवानगी मिळाली स्वातंत्र्य मिळाले. त्या स्वातंत्र्यावर कोणाची गदा यावी अशी आमची इच्छा नाही. मात्र आम्हा मराठी माणसांना लोकशाहीने दिलेले अधिकार, स्वातंत्र मिळाले पाहिजे. महाराष्ट्र आमच्या मागे आहे असे आम्ही गृहीत धरतो महाराष्ट्राने देखील बऱ्याच वेळा आम्हाला साथ देऊन ते दाखवून दिले आहे. आजही सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे. महाराष्ट्र शिवाय आम्ही हे करू शकत नाही. कारण दोन राज्यांतील वादात एका राज्याने न्यायालयात जायचे असते. त्यानुसार महाराष्ट्राची साथ घेऊन आम्ही कोर्टात गेलो आहे. मात्र महाराष्ट्राला कोणी साथ देताना दिसत नाही. वृत्तपत्रांमध्ये महाराष्ट्राला कसपटासमान ठरवला जातो. हा दुभाव कशासाठी? जर तामिळनाडूमध्ये ज्यांनी माजी पंतप्रधानांचा खून केला, बॉम्बस्फोट घडवला. त्यांच्या बाबतीत भूमिका वेगळी आणि महाराष्ट्राच्या बाबतीत भूमिका वेगळी? अशा तऱ्हेचे वातावरण देशात आहे हे काय आहे? याला महाराष्ट्राने सक्षमपणे विरोध दर्शवला पाहिजे.
आपण काय आहोत हे महाराष्ट्राने दाखवले पाहिजे असे बेळगाव राहणाऱ्या तमाम मराठी माणसाचे मत आहे. मात्र त्याबद्दल कोणीच कांही बोलत नाही. आम्ही देखील याबाबतीत थोडे शांत आहोत. कारण तो आमचा प्रश्न नाही. महाराष्ट्राने आपली किंमत खणखणीत वाजवून घेतली पाहिजे या मताचे आम्ही सर्वजण आहोत. त्यामुळे महाराष्ट्राला आम्ही काही विचारू शकत नाही. फक्त त्याचा थोडा आधार मिळतो की नाही याचा विचार करतो आणि त्याप्रमाणे वागतो. आता आता 19 डिसेंबर रोजी काय होते ते पाहू? महाराष्ट्रातील जनता काहीही म्हणो कर्नाटकात बेळगावमध्ये दडपशाही झालेली जी जनता आहे ती न्याय हक्कासाठी प्राणपणाने लढा देणार हे नक्की आहे. या जनतेच्या आधारावरच आम्ही महाराष्ट्र एकीकरण समिती सर्व कारभार चालवते. महाराष्ट्र एकीकरण समितीला कुठे ना कुठे दुर्दम्य आशा आहे की कधीतरी सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय मिळेल. त्यामार्गे दबलेल्या मराठी जनतेला मोकळा श्वास मिळवून देऊ हा आमचा विश्वास आहे.
माननीय शरद पवार साहेबांना मी साद घालू इच्छितो की महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न इत्यादी अंतिम लक्ष द्यावे. आपल्या देशात माजी पंतप्रधानांची बॉम्ब स्फोटाने हत्या करणाऱ्या तामिळनाडूतील लोकांची जन्मठेप माफ केली जाते. तशा पद्धतीचा स्वतंत्र निर्णय आपण घ्यावा. महाराष्ट्र सरकारने स्वतःची हिंमत दाखवावी. तुमच्या कर्तुत्वावर आजपर्यंत आम्ही हा लढा देत आलो आहोत. या लढ्यात आम्ही निश्चितपणे यशस्वी होणार आणि मराठी भाषिकांचे राज्य या भागातही असणार एवढा आमचा विश्वास आहे. या विश्वासाला तडा जाणार नाही तो खोटा ठरणार नाही असे मार्गदर्शन आपण करावे ही विनंती आहे.
महाराष्ट्रातील सरकारने लक्षात घ्यावे की फक्त सत्तेवर असून उपयोग नाही तर त्या सत्तेचा उपयोग सामान्य जनतेच्या भल्यासाठी करणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत. येत्या महामेळाव्याला आपला सुक्त पाठिंबा आहे तो उघड दाखवण्यास काहीच हरकत नाही. कारण यातून तुम्हाला काहीही मिळणार नसले तरी आम्हाला खूप कांही मिळणार आहे असे दीपक दळवी यांनी महाराष्ट्र सरकारला उद्देश बोलताना स्पष्ट केले.