बेळगाव लाईव्ह : गेल्या दोन दिवसांपासून बेळगावचा पार घसरला असून किमान तापमान १५ अंशावर घसरले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेळगावकर थंडीचा अनुभव घेत आहेत. गरिबांचे महाबळेश्वर म्हटल्या जाणाऱ्या बेळगावच्या थंडीत कमालीची वाढ झाली असून उबदार कपड्यांची मागणीही वाढली आहे.
नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजली आहे मात्र रात्री ८ नंतर थंडीमुळे बाजारपेठ देखील कवकर बंद असून नागरिकांची वर्दळ अत्यंत कमी दिसून येत आहे.
शहर परिसरातील सर्व भागात तापमान घसरल्याने अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसून येत आहे. वाढत्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारीही वाढल्या असून दवाखान्यामध्ये सर्दी-पडसे झालेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.
गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावचे तापमान महाबळेश्वरप्रमाणेच घसरते. दिवसभर ऊन असूनही हवेत कमालीचा गारठा जाणवत आहे. ऑक्टोबर महिन्यात थंडीच्या हंगामाला सुरुवात होते. मात्र यंदा म्हणावी तशी थंडी बेळगावमध्ये जाणवली नाही. अशातच ऑक्टोबर महिन्यात देखील पावसाने हजेरी लावल्याने हिवाळा थोडा लांबला. १७ डिसेम्बर पासून पुन्हा बेळगावचे वातावरण थंडावले असून सकाळपासूनच अनेक नागरिकांच्या अंगावर उबदार कपडे दिसून येत आहेत.
शहरात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात घट झाली असून गुरुवारी किमान तापमान १५ अंश सेल्सियस इतके नोंदविले गेले आहे. सकाळी थंडी दुपारी ऊन आणि पुन्हा सायंकाळी ७ नंतर कडाक्याची थंडी असे वातावरण सध्या बेळगावकर अनुभवत आहेत.