हिवाळी अधिवेशनास गैरहजर असलेले भाजपचे आमदार रमेश जारकिहोळी आणि के. एस. ईश्वराप्पा या उभयतांशी आपण संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज सांगितले.
बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे आज मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जारकीहोळी आणि ईश्वरप्पा या उभयतांचा अधिवेशनातील असहभाग म्हणजे बहिष्कार नव्हे. आपल्यावरील दोषारोपातून मुक्त झाल्यानंतरच आपण पुन्हा विधिमंडळात सामील होणे योग्य ठरेल असे त्या उभयतांना वाटते आणि ते योग्यच आहे.
दोघांच्याही समस्येबाबत अलीकडच्या माझ्या दिल्ली भेटीमध्ये चर्चा झाली असून त्यांच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन आहे. मात्र कांही गोष्टी सार्वजनिकरित्या जाहीर करता येत नाही, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.
सीबीआय छाप्या संदर्भात केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात बोलताना त्यांनी ते प्रकरण घटनात्मकरित्या स्थापित केंद्रीय अन्वेषण ब्यूरोकडे (सीबीआय) सोपविण्यात आले आहे
आणि ते योग्य ती कारवाई करतील असे सांगून शिवकुमार यांना देखील त्याची कल्पना असल्याचे नमूद केले. तसेच हलाल कट आणि सरकार यांचा एकमेकांशी काही संबंध नसल्याचेही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.