बेळगाव : ३बी या श्रेणीतून २ए या श्रेणीत आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी पंचमसाली समाजाचे आंदोलन सुरु आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनासंदर्भात अनेकवेळा सरकारने आश्वासने देत आंदोलनकर्त्यांची मने वळविली आहेत. यासंदर्भात आज ५ वाजता मंत्रिमंडळ बैठक बोलाविण्यात आली असून या बैठकीकडे समस्त पंचमसाली समाजाचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर आज बेळगावमध्ये कुडल संगम येथील श्री बसवजय मृत्युंजय स्वामी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद बोलाविण्यात आली होती. यावेळी बोलताना बसवजय मृत्युंजय स्वामी म्हणाले, पंचमसाली समाजाला वाढीव आरक्षण मिळावे यासाठी गेली २ वर्षे संघर्ष सुरु आहे.
आपल्या समाजाने केलेल्या संघर्षाचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर विजापूर येथील आम. बसनगौडा पाटील यत्नाळ, मंत्री सी. सी. पाटील यांनी कोणत्याही कारणास्तव सरकारला घेराव घालू नये, २९ डिसेम्बर रोजी आरक्षणप्रश्नी सरकार आपला निर्णय घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहे. याचप्रमाणे आरक्षणप्रश्नी जनहित याचिका दाखल करण्यात आल्याच्या अफवा पसरत असून याचा आपल्या आंदोलनाशी काहीही संबंध नसल्याचेही स्वामीजींनी स्पष्ट केले.
कर्नाटक सरकार आरक्षणप्रश्नी सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास आहे यासाठी सरकारचा निर्णय येईपर्यंत आपण वाट पाहू . मात्र तोवर पंचमसाली समाजातील नागरिकांनी घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आवाहन बसवजय मृत्युंजय स्वामींनी यावेळी केले.
या पत्रकार परिषदेला माजी आमदार एच. ए. शिवशंकर, आर.के. पाटील, निंगाप्पा पिरोजी आदी उपस्थित होते.