बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये आजपासून विधिमंडळ अधिवेशन सुरु होत असून या अधिवेशनात अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे, या चर्चेतून जनतेला दिलासा मिळेल असे अधिवेशन होईल, तसेच या अधिवेशनात उत्तर कर्नाटकाच्या विकासाला अधिक प्राधान्य देणारी चर्चा होईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
अधिवेशन सुरु होण्यापूर्वी सांबरा विमानतळावर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली, यावेळी या भागातील समस्यांवर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राज्याचे नेतृत्व करण्यासाठी सर्वंकष विचार करून विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात चर्चा करायची असून अनेक कायदे देखील तयार करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
यानंतर विधानसभेत काँग्रेस नेत्यांनी वीर सावरकरांच्या तैलचित्रावरून सुरु केलेल्या गोंधळावर आक्षेप घेत विधानसभेत अशापद्धतीने छेडलेले अंदोलन योग्य नसल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. यासंदर्भात विरोधी पक्षनेते आणि सभापतींशी चर्चा करण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.