बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये सोमवारपासून विधिमंडळ अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात सीमाप्रश्न हा महत्वाचा मुद्दा उपस्थित होणार यात शंकाच नव्हती. सत्ताधारी आणि विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला.
मात्र यादरम्यान बेळगावमधील स्थानिक आमदार गैरहजर असल्याचे निदर्शनात आले. यामुळे याचदरम्यान आमदार अनुपस्थित का राहिले? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहात आहेत. बेळगावमध्ये जागांपेक्षा इच्छुकांची यादी भली मोठी आहे. राष्ट्रीय पक्षांसमोर उमेदवार निवड करणे हा पेच आहे.
अशातच सीमाप्रश्नाचा मुद्दा ऐरणीवर असल्याकारणाने आणि बेळगावमधील मराठी भाषिकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारांची निवड आणि निवडलेल्या उमेदवाराकडून मराठी माणसाचे मन राखण्याची कसब यामुळे सर्व बाजूने निवडणुकीच्या दृष्टिकोनातून समतोल राखण्याचा प्रयत्न इच्छुक उमेदवार करत आहेत. काही कालावधीतच राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांची नावे जाहीर होतील. परंतु आतापासूनच सर्व मतदारांचे मन राखून आपली राजकीय कारकीर्द राखून ठेवण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे, याचा प्रत्यय अधिवेशन काळात येत आहे.
बेळगाव दक्षिण, उत्तर, यमकनमर्डी आणि ग्रामीण मतदार संघातील आमदार नेमके सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावर चर्चा सुरु असताना अनुपस्थित राहिल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे. सभागृहात विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी सीमाप्रश्नाचा मुद्दा उचलून धरला आणि यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी राज्य शासनाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहिल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. सीमाप्रश्नी गांभीर्याने चर्चा सुरु असताना स्थानिक आमदार मात्र अनुपस्थित राहिल्याने यामागचे नेमके गौडबंगाल काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.