बेळगाव लाईव्ह : चौधरी चरणसिंग यांचा जन्मदिवस राष्ट्रीय कृषी दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. आज दर्शवेळा अमावास्येनिमित्त समस्त शेतकरी बांधव पीक पूजनासाठी शेतजमिनीत गोड जेवणाचा बेत आखतात.
कृषिदिन आणि दर्शवेळा अमावस्या हा योगायोग जुळून आल्याने आज हलगा – मच्छे येथील शेतकऱ्यांनी पिकाऊ जमिनीत कृषी दिन आचरणात आणला.
बेकायदेशीर रित्या बायपाससाठी हलगा-मच्छे येथील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादनाचा घाट घालण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनी संपादित करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे षडयंत्र सरकारने रचले असून याचा निषेध यावेळी करण्यात आला.
सरकारने जारी केलेले शेतकऱ्यांसाठी मारक असलेले कृषी कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव जाहीर करण्यात यावा, उसाला हमीभाव देण्यात यावा, वीज खाजगीकरण रद्द करावे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, रोगामुळे दगावलेल्या जनावरांची भरपाई मिळावी, पिकाऊ जमिनीत बेकायदेशीररीत्या झालेले अतिक्रमण हटविण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना इतर भेडसावणाऱ्या समस्याच तातडीने सोडवाव्यात, असे ठराव यावेळी सर्वानुमते संमत करण्यात आले.
याचप्रमाणे शेतकऱ्यांना सरकारकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर रयत संघटनेच्या माध्यमातून लढा देत , शेतकरी न्याय मिळविल्याशिवाय राहणार नाहीत असा निर्धार करत उपस्थित शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
यावेळी बेळगाव तालुका रयत संघटना अध्यक्ष राजू मरवे,रयत संघटना नेते प्रकाश नायक,शेतकरी संघटना महिला जिल्हाध्यक्षा शिवलिला मिसाळे,शेकापचे विलास घाडी,सुभाष चौगले,हणमंत बाळेकुंद्री, भोमेश बिर्जे,गोपाळ सोमनाचे,सुरेश मऱ्याक्काचे,मारुती बिर्जे,लक्ष्मण देमजी,सचिव अनिल अनगोळकर,नितिन पैलवानाचे,भैरु कंग्राळकर, तानाजी हालगेकर,प्रदिप बिर्जे,महिला शेतकरी सवीता बिर्जे, शोभा मोरे आदी शेतकरी उपस्थित होते.
Very nice and good