बेळगाव जिल्ह्यातील 49 ‘क’ प्रवर्ग मंदिरांवर प्रशासकीय कमिटी नेमून सदर मंदिरांवर शासकीय नियंत्रण ठेवण्याचा आदेश सरकारकडून बजावण्यात आला आहे.
दक्षिण काशी म्हणून सुपरिचित कपिलेश्वर मंदिरासह बेळगाव जिल्ह्यातील 49 ‘क’ प्रवर्ग मंदिरांवर प्रशासकीय कमिटी नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व मंदिरांना नोटीस बजावण्यात ण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन आणि धर्मादाय खात्याकडून गेल्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या बैठकीमध्ये संबंधित 49 मंदिरावर प्रशासकीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शहरातील कपलेश्वर देवस्थान, साई मंदिर टिळकवाडी, लगमव्वा देवी मंदिर, मारुती मंदिर, ब्रह्मलिंग मंदिर (सर्व केदनूर), मारुती मंदिर (मोदगा), गिरिजा मंदिर (कानशीनकोप्प), भैरव कलमेश्वर अश्वत नारायण मंदिर (होनगा), लक्ष्मी मंदिर (ढोणेवाडी), बसवेश्वर मंदिर (मुगळी ता. चिक्कोडी), मल्लिकार्जुन मंदिर (बंबलवाड ता. चिक्कोडी), रेणुका मंदिर (खजनगौडनहट्टी चिक्कोडी) रामलिंगेश्वर देवस्थान (हणभरट्टी), बिरदेव देवस्थान (एम. के. हुबळी), बसवेश्वर मंदिर (खानापूर), भूवराह नृसिंह मंदिर (हलशी) आणि संगमेश्वर देवस्थान (मोळवाड) या मंदिरांना नोटीस धाडण्यात आली आहे. या मंदिरांसह हुक्केरी, निपाणी, बैलहोंगल, कित्तूर, गोकाक व कागवाड तालुक्यातील 18 मंदिरांवर नऊ जणांची समिती स्थापन करण्यासंबंधी एक महिन्यात पूर्वीपासून पत्रव्यवहार सुरू आहेत.
धर्मादाय विभागाने सर्व मंदिरांना पाठविलेल्या पत्रातील माहितीनुसार जिल्ह्यातील एकूण 49 ‘क’ प्रवर्ग देवस्थानांवर पुढील तीन वर्षासाठी 9 जणांची प्रशासकीय समिती स्थापना बाबत अर्ज मागविण्यात आले आहेत. दरम्यान कपिलेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री यांनी हिंदू मंदिरांमधील सरकारचा हस्तक्षेप आम्हाला मान्य नाही. त्यामुळे सरकारच्या आदेशाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.