Sunday, May 5, 2024

/

शबरीमलासाठीच्या विशेष एक्सप्रेस रेल्वेचे उद्घाटन

 belgaum

केरळ मधील शबरीमला येथील श्री अय्यप्पा स्वामी देवस्थानाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी नैऋत्य रेल्वेने बेळगाव -कोल्लम या मार्गावर विशेष एक्सप्रेस रेल्वे सुरू केली असून या रेल्वे सेवेचा उद्घाटन सोहळा आज रविवारी सकाळी पार पडला.

केरळ मधील सबरीमला या श्री अय्यप्पा स्वामी देवस्थानाच्या ठिकाणी जाण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वे सेवेचा उद्घाटन सोहळा आज सकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावर आयोजित करण्यात आला होता. सदर सोहळ्यास उद्घाटक म्हणून पर्यावरण पुरस्कर्त्या पद्मश्री पुरस्कार विजेत्या 112 वर्षीय डॉ. सालमरद तिमक्का आणि सन्माननीय अतिथी म्हणून बेळगावच्या खासदार मंगला अंगडी उपस्थित होत्या.

यावेळी खासदार अंगडी यांच्या हस्ते फुलांचे हार आणि केळीच्या झाडांनी सजविलेल्या विशेष रेल्वेचे पूजन करण्यात आल्यानंतर डॉ. सालमरद यांच्या हस्ते रेल्वे सेवेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके, डॉ सालमरू तिमक्का यांचे दत्तक पुत्र व भारतीय अय्यप्पा स्वामी सेवा समितीचे अध्यक्ष उमेश आदी मान्यवरांसह रेल्वेचे अधिकारी आणि अय्यप्पा स्वामी भक्त बहुसंख्येने उपस्थित होते. उद्घाटन समारंभ नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके यांनी रेल्वे सेवेच्या उद्घाटनाची आणि उद्घाटक डॉ. सालमरद तिमक्का यांच्याबद्दल माहिती दिली. तसेच बेळगाव भागातील तमाम जनतेसह प्रामुख्याने भारतीय अय्यप्पा स्वामी सेवा समितीचे सदस्य अय्यप्पा भक्त व इतर भाविकांनी या विशेष रेल्वे सेवेचा सदुपयोग करून फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 belgaum

बेळगाव, हुबळी या परिसरात अय्यप्पा स्वामींचे अनेक भक्त आहेत. केरळ मधील शबरीमला येथील अय्यप्पा स्वामी देवस्थानाच्या ठिकाणी जाण्यास थेट रेल्वे सेवा नसल्याने भाविकांना बेळगावहून बेंगलोर व तेथून शबरीमला येथे पोहोचावे लागत होते. त्यामुळे या मार्गावर बेळगाव येथून रेल्वे सुरू करण्याची मागणी मागील कांही दिवसांपूर्वी खासदार मंगला अंगडी यांनी नैऋत्य रेल्वेकडे केली होती. या मागणीची दखल घेत नैऋत्य रेल्वेने बेळगाव -कोल्लम ही विशेष एक्सप्रेस रेल्वे सुरू केली आहे. सदर एक्सप्रेस रेल्वे सेवा आज रविवारपासून येत्या जानेवारी 15 पर्यंत प्रत्येक रविवारी उपलब्ध असणार आहे. बेळगाव -कोल्लम एक्सप्रेस रेल्वे रविवारी सकाळी 11:30 वाजता बेळगावहून निघणार असून सोमवारी दुपारी 3:15 वाजता कोल्लम येथे पोहोचेल.

त्याचप्रमाणे परतीच्या प्रवासात सदर एक्सप्रेस सोमवारी सायंकाळी 5:10 वाजता कोल्लम येथून निघणार असून मंगळवारी रात्री 11 वाजता बेळगावला पोहोचेल. बेळगावहून आज 20 नोव्हेंबरपासून 15 जानेवारीपर्यंत, तर 21 नोव्हेंबर ते 16 जानेवारीपर्यंत कोल्लम इथून साप्ताहिक स्वरूपात ही एक्सप्रेस धावणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.