कर्नाटक काँग्रेस कमिटी (केपीसीसी) कडून राज्यभरातील काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्याची प्रक्रिया बेंगळूर येथील कार्यालयात सुरू असून त्या अंतर्गत बेळगाव येथील अनेक मतदारसंघांमधून देखील इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत.
बेळगाव दक्षिण विधान सभा मतदार संघातून काँग्रेसचे माजी आमदार रमेश कुडची यांच्या व्यतिरिक्त दोन मराठी चेहऱ्यानी देखील उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे.
माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्यानंतर पूर्वाश्रमीचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते सध्या काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले सातेरी उर्फ एस एम बेळवटकर यांनी देखील इच्छुक म्हणून अर्ज दाखल केला आहे.
शनिवारी बेंगलोर येथील के पीसीसीच्या कार्यालयात केपीसीसी सचिव नारायण यांच्याकडे इच्छुक उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.
मराठी बहुल बेळगाव दक्षिण मतदार संघातून माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांच्यासह एस एम बेळवटकर अश्या दोन मराठी इच्छुक चेहऱ्यानी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे.आगामी दिवसात काँग्रेस मधून कोणाला उमेदवारी तिकीट मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बेळवटकर यांनी 2013 च्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकिकरण समितीकडून देखील बेळगाव दक्षिण मतदार संघासाठी उमेदवारी मिळावी यासाठी अर्ज दाखल केला होता त्यावेळी प्रबळ दावेदारी असलेल्या माजी आमदार कै. संभाजी पाटील यांना उमेदवारी मिळाली होती.