बेळगाव : बेळगावमधील शिवबसव नगर येथील श्री ज्योतिर्लिंग देवस्थानात कार्तिक मासानिमित्त रविवारी भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ५००१ दिव्यांची आरास करून मंदिर आणि मंदिर परिसर उजळून निघाला होता. आकर्षक रांगोळ्या आणि मंदिराला करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे रविवारी सायंकाळी मंदिर परिसर दिव्यांच्या रोषणाईत उजळून निघाला होता.
लाखो भाविकांचे कुलदैवत, श्रद्धास्थान आणि आराध्य दैवत असणाऱ्या श्री ज्योतिबाचा रविवार हा महत्वाचा दिवस आहे. या औचित्याने कार्तिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवात असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला होता.
यावेळी शिवबसव नगर येथील एसबीआय बँकेच्या चीफ मॅनेजर आशा कोटनीस या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक अमर येळ्ळूरकर यांनी केले. दीपोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात ‘ई-हुंडीचा’ लोकार्पण सोहळा देखील पार पाडण्यात आला. मंदिर परिसरात ‘ई-हुंडी’ स्थापन करण्यासाठी कोटनीस यांनी खूप परिश्रम घेतली असून यावेळी बोलताना त्यांनी ‘ई-हुंडी’चे महत्व तसेच याच्या वापरासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. सध्या सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने होत असून यामुळे मंदिर व्यवस्थापनाच्या सर्व आर्थिक गोष्टी पारदर्शक होण्यासाठी मदत होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
देवस्थानाचा सर्व कारभार पारदर्शक राहावा, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘ई-हुंडी’चे, ज्येष्ठ भक्त कैलाशनाथ यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. तर उपस्थित महिलांच्या हस्ते दीपोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. मंदिर परिसराची शोभा वाढविण्यासाठी शास्त्रीनगर येथील महिलांनी आकर्षक अशा रांगोळ्यांनी मंदिर परिसर सजविला होता.
मंदिराच्या चारीबाजूंनी रंगीबेरंगी आणि सुरेख रांगोळ्या रेखाटून मंदिर परिसराच्या शोभेत आणखीन भर पडली होती. चारीबाजूंनी उजळून निघालेला मंदिर परिसर, मंदिराला करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे संपूर्ण मंदिर परिसराला आगळीवेगळी शोभा आली होती. या दीपोत्सवात बहुसंख्य भाविकांनी सहभाग घेतला होता.