रेल्वे मार्ग दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्यामुळे नैऋत्य रेल्वेच्या रेल्वेसेवा वेळापत्रकात बदल करण्यात आला असून कांही रेल्वे रद्द तर कांही अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत.
नैऋत्य रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकारनुसार रेल्वे क्र.17331 मिरज -हुबळी एक्सप्रेस रेल्वे दि. 22 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर रेल्वे क्र.17362 हुबळी -मिरज एक्सप्रेस रेल्वे दि. 22 ते 30 नोव्हेंबर दरम्यान रद्द केली गेली आहे. खानापूर ते गुंजी या दरम्यान दुपदरीकरणाचे काम केले जाणार असल्याने लोंढा -मिरज मार्गावरील रेल्वे वेळापत्रक बदल करण्यात आला असून मिरज -लोंढा, लोंढा -मिरज (अनुक्रमे रेल्वे क्र.07351, 07352) एक्सप्रेस रेल्वे दि 22 ते 30 नोव्हेंबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
याखेरीज कॅसलरॉक -मिरज रेल्वे (क्र.17334) आणि मिरज -कॅसलरॉक (रेल्वे क्र.17333) एक्सप्रेस रेल्वे दि. 22 ते 30 नोव्हेंबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
रेल्वे क्र. 11098 एर्नाकुलम -पुणे एक्सप्रेस रेल्वे दि. 21 ते 28 नोव्हेंबर दरम्यान कोंकण मार्गे मडगांव, माजोर्डा, मडुरे, रोहा, पनवेल, कर्जत, लोणावळा मार्गे पुण्याला धावणार आहे. रेल्वे क्र.12782 हजरत निजामुद्दीन -म्हैसूर एक्सप्रेस रेल्वे दि. 21 ते 28 नोव्हेंबर दरम्यान पुणे, दौंड, सोलापूर, होटगी, गदग, हुबळी मार्गे धावणार आहे.