एकेकाळी राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या स्थापनेला पाठिंबा देणारे हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) गाव आता विद्यापीठाविरुद्धच संतप्त झाले असून तेथील शेतकऱ्यांनी विद्यापीठाचे अधिकारी आणि बेळगाव प्रांताधिकाऱ्यांसमोर तसे जाहीर केले आहे.
हिरेबागेवाडी गावातील गुड्डा मल्लाप्पन या जागेच्या ठिकाणी राणी चन्नम्मा विद्यापीठाचे (आरसीयू )अधिकारी आणि प्रांताधिकार्यांनी भेट दिली असता गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपली भूमिका स्पष्ट केली. मल्लाप्पन गुड्डा या सुमारे 100 एकर जागेमध्ये राणी चन्नम्मा विद्यापीठाकडून इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
या बांधकामाच्या ठिकाणी ये -जा करण्यासाठी रस्ता तयार करण्याद्वारे राणी चन्नम्मा विद्यापीठ सुपीक शेत जमिन बळकाऊ पाहत आहे असा शेतकऱ्यांचा आरोप असून त्यांच्यात संताप व्यक्त होत आहे. संबंधित इमारतीच्या ठिकाणी जाणाऱ्या 20 फूट रुंदीच्या रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी आणखी 10 फूट जमीन जादाची दिली आहे.
मात्र तरी देखील कोणतीही पूर्वकल्पना न देता विद्यापीठाकडून शेतकऱ्यांच्या शेतामधून आणखीन एक रस्ता केला जात आहे. तसेच फक्त हा रस्ता करून न थांबता जेसीबीच्या सहाय्याने उभे पीक उध्वस्त केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून विद्यापीठाने शेतकऱ्यांची पायवाट बंद करून तेथे मोठी भिंत बांधली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आपली जमीन दिली आहे ते पुन्हा त्या जागेत घुसू नयेत यासाठी दुर्दैवाने विद्यापीठाने कुंपण घालून संबंधित जागाही बंदिस्त केली आहे. राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना शिवीगाळ करण्याबरोबरच त्यांच्या ऊस वाहतुकीस अडथळा निर्माण केला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या संदर्भात गेल्या कांही महिन्यांपासून विद्यापीठ प्रशासनाकडे सातत्याने तक्रार करून देखील अद्यापपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांवरील दडपशाही अशीच सुरू राहिल्यास विद्यापीठाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. तसेच विद्यापीठाने गुड्डा मल्लाप्पन येथील विकास कामाची ब्लू प्रिंट शेतकऱ्यांना दाखवून त्यांची खातरजमा करावी आणि त्यानंतरच काम पुढे सुरू ठेवावे, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.