बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील ३१ गावांमधील हजारो एकर सुपीक जमीन संपादित करून कर्नाटक सरकारने घातलेला रिंग रोडचा घाट मोडून काढण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने एल्गार पुकारला आहे. २८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट चाबूक मोर्चाच्या माध्यमातून रिंग रोडला विरोध करण्यासाठी हजारोंच्या संख्येने मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून आजपर्यंत या मोर्चसाठी विविध संघ-संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. आज शेतकरी नेते सिदगौडा मोदगी यांनीही या मोर्चाला पाठिंबा दर्शवून शेतकऱ्याच्या हितासमोर कोणतेही राजकारण शून्य असल्याचे सिद्ध केले आहे.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अंतर्गत या चाबूक मोर्चाचे आयोजन केल्यामुळे रिंग रोड ला दर्शविण्यात येणार विरोध हा एकाच भाषिकांपुरता मर्यादित असल्याचे भासत होते. मात्र भाषावाद आणि राजकारण या सर्व गोष्टींना फाटा देत शेतकऱ्यांचे हीत जोपासण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी नेते सिदगौडा मोदगी यांनीही आज या मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे.
बेळगावमधील विविध गावातील सुपीक जमिनी संपादित करून रिंग रोडचा घाट घालण्यात आला असून सदर रिंगरोडला विरोध करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली २८ नोव्हेंबर रोजी विशाल चाबूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी चाबूक उगारण्यात येणार असून वेळप्रसंगी हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी केला आहे. या चाबूक मोर्चाला अनेक संघ, संस्थांनी पाठिंबा दर्शविला असून मोठया संख्येने शेतकरी कुटुंबासमवेत या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
चाबूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध भागात जनजागृतीसाठी बैठका आयोजित करण्यात येत असून बैलगाड्या, ट्रॅक्टर यासह प्रत्येक शेतकऱ्याने कुटुंबासमवेत सहभागी होण्याचे आवाहन या बैठकीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या बैठकीमध्ये प्रत्येकाने उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवित मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आश्वासन दिले जात आहे.
एकजुटीच्या ताकदीवर आपली वज्रमूठ सरकारला दाखविण्याचा निर्धार शेतकऱ्यांसह अनेक संघटनांनीही केला असून आता शेतकरी नेते सिदगौडा मोदगी यांनीही पाठिंबा दर्शविल्याने रिंगरोड विरोधी आंदोलनाला आणखीन बळ मिळाले आहे.