बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणेसह अन्य घोषणांनी शहर दणाणून सोडण्याद्वारे महाराष्ट्रात जाण्याची प्रबळ इच्छा व्यक्त करणारी काळा दिनाची विराट मूक सायकल फेरी आज मंगळवारी सकाळी शांततेत पार पडली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखालील या फेरीत महिलांसह हजारो मराठी भाषिकांनी सहभागी होऊन आपल्या एकीच्या वज्रमुठीचे दर्शन घडविले.
भाषावार प्रांत रचने वेळी 1956 साली झालेल्या अन्याया विरोधात आज मंगळवारी 1 नोव्हेंबर रोजी काळा दिनाच्या मुक निषेध फेरीत सहभागी होण्यासाठी शहर परिसरातील हजारो मराठी भाषिक अबाल वृद्ध रस्त्यावर उतरले होते. युवक आणि महिलांचा अर्थात समितीच्या रणरागिणींचा लक्षणीय सहभाग असलेल्या या मुक निषेध फेरीला. धर्मवीर संभाजी उद्यान येथून सकाळी नऊ साडेनऊच्या सुमारास बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, पुण्यश्लोक धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे आदी घोषणांनी निषेध फेरीला सुरुवात झाली.
फेरीच्या अग्रभागी भगव्या ध्वजांसह माजी आमदार मनोहर किनेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, प्रकाश मरगाळे, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, युवा समितीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आदी नेते मंडळी उपस्थित होती. निषेध फेरीत हजारोच्या संख्येने सहभागी झालेले काळा पोशाख परिधान केलेले व काळ्याफिती लावलेले मोर्चेकरी, काळ्या साड्यांमधील समितीच्या रणरागिणी आणि डौलाने फडकणारे भगवे ध्वज साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
निषेध फेरीतील अबालावृद्ध मराठी भाषिकांच्या लक्षणीय सहभागामुळे फेरीच्या मार्गावर जणू जनसागरच अवतरला होता. निषेध फेरी दरम्यान केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणासह बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, बेळगाव आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल मे, कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, बघता काय सामील व्हा, गर्वसे बोलो जय महाराष्ट्र आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात येत होता. सदर निषेध फेरीची नियोजित मार्गाने शांततेत गोवावेस येथे सांगता झाली. काळा दिनानिमित्त काढण्यात आलेल्या आजच्या या निषेध फेरीसाठी पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्तासाठी प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
निषेध फेरी दरम्यान बेळगाव लाईव्हशी बोलताना म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकर यांनी गेल्या 65 वर्षात महाराष्ट्र सरकारने योग्य लक्ष दिले असते तर सीमाप्रश्न सुटला असता असे मत व्यक्त करण्याबरोबरच महाराष्ट्र सरकार स्वतःचा प्रश्न समजून सीमाप्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे असे सांगितले. आजच्या विराट निषेध फेरीद्वारे मागून मिळत नसेल तर हिसकावून घेण्याची आमच्यात ताकद आहे हे आम्ही दाखवून दिले आहे. सीमाप्रश्न आमचा आम्ही सोडवून घेण्यास समर्थ आहोत हे आम्ही मराठी भाषिकांनी आज दाखवून दिले असले तरी याबाबतीत महाराष्ट्राला सोबत घेऊन पुढे जावे या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत असे किनेकर यांनी स्पष्ट केले. प्रकाश मरगाळे, सरस्वती पाटील, सरिता पाटील, रेणू किल्लेकर, आर. एम. चौगुले, शिवाजी सुंठकर आदींनी देखील यावेळी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना बेळगावसह सीमाभाग जोपर्यंत महाराष्ट्रात सामील होत नाही तोपर्यंत आमची रस्त्यावरील लढाई सुरूच राहील असे सांगितले.
ॲड. महेश बिर्जे यांनी यावेळी बोलताना महाराष्ट्रातील नेते कधीही सीमा प्रश्न सोडवणुकीसाठी सीमा वासियांच्या मागे एकजुटीने उभे राहिलेले नाहीत. कर्नाटकात कन्नड भाषेसाठी सर्व नेते संघटित होतात तसे महाराष्ट्रातील नेत्यांनी विधानसभा अथवा लोकसभेत सीमाप्रश्नी जोरदार आवाज उठवलेले कोठेही दिसले नाही. वास्तविक म. गांधींच्या विचारसरणीने लोकशाही मार्गाने गेली 65 वर्षे सुरू असलेला देशातील हा सर्वात मोठा सीमाप्रश्नाचा लढा आहे. मात्र आजतागायत मराठी भाषिकांना न्याय न मिळाल्यामुळे म. गांधी ऐवजी शहीद भगतसिंग यांच्या मार्गाने आम्ही लढा दिला असता तर आज सर्वोच्च न्यायालयात जाण्याची वेळ आली नसती असे सांगून त्यामुळे महाराष्ट्राने हा लढा गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर सीमावासिय मराठी बांधवांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ॲड. बिर्जे यांनी केली. संतोष मंडलिक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना महाराष्ट्र सरकारने आता तरी जातीने लक्ष देऊन सीमा भागातील मराठी भाषिकांना कर्नाटकच्या गुलामगिरीतून मुक्त करावे. आम्हा मराठी भाषिकांची कर्नाटकात राहण्याची अजिबात इच्छा नाही.
आम्हाला आमच्या भाषेच्या राज्यात महाराष्ट्रात जाण्याची इच्छा आहे. आम्हाला याबाबतीत जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे सांगून जेवढे अन्याय करायचे करा आम्ही न्याय मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे मंडलिक यांनी स्पष्ट केले.