खानापूर शहराला लागून असलेल्या रूमेवाडी क्राॅसवरील पणजी- बेळगाव महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटलेल्या टिप्परने धडक दिल्याने एका दुचाकीस्वारासह त्याच्या सोबतची मुलगी असे दोघे जागीच ठार झाले, तर आणि एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
खानापूर तालुक्यातील बिडी -हिंडले गावचे प्रदीप मारूती कोलकार (वय ३७) व ऐश्वर्या गुरणावर (वय २०, रा. तोलगी) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. प्रवीण कोलकार हे आपल्या मामाची मुलगी ऐश्वर्या हिला खानापूर येथे सोडण्यासाठी घेऊन जात असताना रुमेवाडी फाट्यावर टिप्परने त्यांना धडक दिली.
याचबरोबर वनखात्याचा एक कर्मचारी दुचाकीवरून येत असताना त्यालाही टिप्परची धडक बसताच त्याने गाडीवरून उडी घेतली त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. मात्र त्यामुळे सुदैवाने त्याचा जीव बचावला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
टिप्पर रेल्वेचे सिमेंट खांब घेऊन खानापूरकडे जात असताना चालकाचा नियंत्रण सुटून टिप्परने रस्त्यावरून जाणाऱ्या दोन दुचाकींना जोराची धडक दिली.
पणजी-बेळगाव महामार्गावरील रूमेवाडी क्राॅसवरील रस्त्यावर अनेक खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण उडाली आहे. या रस्त्याची दुरवस्था झाली असून या रस्त्यावरून नेहमी अनेक अवजड वाहनांची वर्दळ असते. करंबळ क्रॉस ते खानापूर येथील मासळी बाजार या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पसरले आहेत.
या मार्गावरून ये -जा करणाऱ्या नागरिकांना नेहमीच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्याची केवळ डागडुजी करून तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार केला जात आहे. वारंवार होणाऱ्या अपघातामध्ये अनेकांचे बळी जात असून याकडे लोकप्रतिनिधी कधी गांभीर्याने लक्ष देणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.