देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात आलेला बेळगाव शहरानजीकचा कणबर्गी तलाव सध्या रात्रीच्या वेळी अंधारात बुडून जात असून लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शहरानजीकच्या कणबर्गी तलाव येथे विविध विकास कामे राबवून कोट्यावधी रुपये खर्च करण्याद्वारे या तलावाचा कायापालट करण्यात आला आहे. सदर तलाव सुमारे 7 एकर जागेत विस्तारला आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कणबर्गी तलावाचे सुशोभिकरण करून त्याचा कायापालट करण्यासाठी तब्बल 4 कोटी 28 लाख 30 हजार 933.82 रुपये खर्च करण्यात आले आहेत. सदर तलावाच्या ठिकाणी विकास कामे गेल्या फेब्रुवारी 2021 मध्ये पूर्ण होऊन हा तलाव जनतेसाठी खुला करण्यात आला.
प्रारंभीच्या काळात सर्व कांही सुरळीत होते. सायंकाळनंतर या ठिकाणी फिरावयास येणाऱ्यांना सोयीचे जावे यासाठी तलाव परिसरात दिव्यांची उत्तम सोयही करण्यात आली आहे.
त्यामुळे तलाव परिसर उजळून जात होता. मात्र अलीकडे या तलावाच्या देखभालीकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी देखभाली अभावी या ठिकाणचे दिवे बंद अवस्थेत असल्यामुळे सायंकाळ नंतर रात्रीच्या वेळी येथे अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
त्यामुळे सायंकाळनंतर तलावाच्या ठिकाणी कोणी फिरकेनासे झाले आहे. बंद अवस्थेतील दिव्यांसंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त होत असून लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.