विकासाच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्रामध्ये बेळगावच्या तुलनेत हुबळीला अधिक प्राधान्य मिळत असल्याची खंत आम आदमी पक्षाचे नेते राजीव टोपण्णावर यांनी व्यक्त केली आहे. केवळ विमानतळ विमान सेवा नव्हे तर सरकारी प्रकल्पातूनही बेळगावला डावलण्यात येत आहे. मात्र त्याकडे बेळगावच्या लोकप्रतिनिधींचे लक्षच नसून ते लॉबिंगमध्ये कमी पडत असल्याचा आरोप देखील त्यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना केला.
बेळगावहुन पूर्वी बेंगलोरसाठी तीन विमान सेवा होत्या मात्र केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यामुळे त्यापैकी फक्त एक बेळगावसाठी ठेवून उर्वरित दोन विमानसेवा हुबळीकडे वळविण्यात आल्या. यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि प्रवासी विमान कंपन्यांवर दबाव टाकण्यात आला. हुबळी बेंगलोर विमानसेवेमुळे फारसा फरक पडत नाही बेळगावचे लोक रस्ते मार्गे अल्पावधीत उघडीला येऊ शकतात, असे कारणही देण्यात आले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हे भाजपच्या कोर कमिटीमध्ये असल्यामुळे बेळगावचे स्थानिक भाजप लोकप्रतिनिधी देखील त्यांच्या विरोधात आवाज उठवू शकत नाहीत याचा फायदा उठवला जात आहे. बेळगावचे प्रकल्प हुबळी धारवाडला नेण्याइतपत हे मर्यादित नसून मिळणारे कमिशन ही त्याला कारणीभूत आहे, असे टोपण्णावर यांनी परखडपणे सांगितले.
वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवेद्वारे अत्यंत जलद गतीने प्रवासी वाहतूक करण्याबरोबरच प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरविल्या जातात. ही रेल्वे सेवा देखील कर्नाटकची दुसरी राजधानी मानल्या जाणाऱ्या बेळगावपर्यंत करण्याऐवजी हुबळीपर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली आहे. मी आवाज उठवल्यानंतर बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी या रेल्वेची मागणी केली आहे. मात्र त्यांच्या मागणीची दखल घेतली जाण्याची शक्यता कमी आहे, असे ते म्हणाले.
कर्नाटक सरकारने हुबळी -धारवाड, बेळगावसाठी टेक्नॉलॉजी आधारित ‘स्टार्टअप क्लस्टर’ बनविला आहे. या क्लस्टरमध्ये बेळगावचा नावापुरताच समावेश आहे. कारण सध्या या क्लस्टरसाठीचे सर्व प्रकल्प आणि कार्यक्रम हुबळीतच राबविले जात आहेत. एक महिन्यापूर्वी टेक्लरेशन नावाचा कार्यक्रम हुबळीत करण्यात आला. त्यावेळी बेळगावच्या एकाही आमदाराला निमंत्रित करण्यात आले नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे. याखेरीज ‘स्टार्टअप लॉन्च पॅड’ म्हणून परवाच एक घोषणा करण्यात आली. हा 100 कोटी रुपयांचा प्रकल्प धारवाडला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 6 महिन्यापूर्वी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्सी एक्सलन्स सेंटर’ हा 150 कोटी रुपयांचा प्रकल्प बेळगावसाठी घोषित करण्यात आला होता. मात्र आता तो हुबळीकडे वळविण्यात आला आहे.
या खेरीज हुबळी -धारवाडला बेळगाव पेक्षा चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आल्या आहेत हुबळीची लोकसंख्या 21 लाख तर बेळगावची 53 लाख इतकी आहे. मात्र तरीही बेळगावकडे खाटांची (बेड्स) सुविधा कमी आहे असे सांगून बेळगावचे लोकप्रतिनिधींना गरबा-दांडिया, पतंग महोत्सव, ढोल वादन आदींमध्ये जास्त रस आहे ते त्यामध्येच व्यस्त असतात खरे तर त्यांनी महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी झगडले पाहिजे. परंतु दुर्दैवाने त्यांना ती बुद्धीच नाही, असे परखड मत आप नेते राजीव उर्फ राजू टोपण्णावर यांनी शेवटी व्यक्त केले.