बेळगाव : शारीरिकदृष्ट्या ७५ टक्के आणि १०० टक्के दिव्यांगांना सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या पेन्शनच्या रकमेत वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी दिव्यांगांच्यावतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, कोविडनंतर निर्माण झालेली आर्थिक टंचाई आणि बेरोजगारी यामुळे सध्या अनेक दिव्यांग आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. शारीरिकदृष्ट्या ७५ टक्के आणि १०० टक्के दिव्यांगांना सरकारतर्फे दरमहा १४०० रुपये पेन्शन देण्यात येते. मात्र वाढती महागाई आणि आर्थिक अडचणी पाहता या रकमेत वाढ करून ३००० ते ५००० रुपये अशी पेन्शन पुरविण्यात यावी, अशी मागणी दिव्यांगांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडे करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या शिरस्तेदारांना आपल्या विविध समस्यांविषयी दिव्यांगांनी माहिती दिली. तसेच सदर समस्या तातडीने सोडविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विनंतीही करण्यात आली.
यावेळी नेमिनाथ बस्तवाड, अब्दुल रेहमान, नागाप्पा सानिकोप्प, पार्वतीअव्वा, निंगव्वा मादार, महादेवी कित्तूर, उमेश रट्टी, शकीला बानू सुतकट्टी आदी उपस्थित होते.