गांजा प्रकरणाशी संबंधित चौकशीसाठी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणलेल्या एका संशयित आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री घडली.
बसनगौडा इरणगौडा पाटील (वय 45, रा. बेल्लदबागेवाडी ता. हुक्केरी) असे मयत संशयित आरोपीचे नांव आहे. अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातील (एनडीपीएस) तरतुदी अंतर्गत त्याला चौकशीसाठी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल शुक्रवारी सायंकाळी बेळगाव ग्रामीण पोलिस बसनगौडा याला गांजा प्रकरणी पकडून पोलीस ठाण्यात नेत असताना त्याने आपली प्रकृती बिघडल्याचे सांगितले.
तेंव्हा पोलिसांनी त्याच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून घेतले आणि जेंव्हा तो व्यवस्थित स्थिर झाला तेंव्हा त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलीस ठाण्यात काही वेळाने बसनगौडा इरणगौडा पाटील याला उलट्या होऊ लागल्या.
तेंव्हा त्याला उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (बीम्स) हलविण्यात आले. मात्र हॉस्पिटलमध्ये उपचाराचा फायदा न होता त्याचा मृत्यू झाला.
मयताच्या पत्नीने केलेल्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून हे प्रकरण अधिक तपासासाठी सीआयडी बेंगलोरकडे सोपविण्यात आले आहे.