बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असणाऱ्या चंदगड तालुक्यातील किटवाड येथील धरणाच्या धबधब्याच्या ठिकाणी आज चार महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. पाण्यात उतरणे जीवावर बेतले असून पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात पडल्याने हि दुर्घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, उज्वलनगर येथे असणाऱ्या मदरशामधून आज किटवाड येथे सहल काढण्यात आली होती. पर्यटनासाठी मदरशा मधील शिक्षिका आणि विद्यार्थिनी अशा एकूण ४० जणांचा समूह पर्यटनासाठी गेला होता. दरम्यान धबधब्याच्या ठिकाणी पाचजणी पाण्यात उतरले होते त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने एकीचा पाय घसरला आणि त्यापाठोपाठ वाचविण्यासाठी गेलेल्या उर्वरित चौघींसह एकूण पाचजणी पाण्यात बुडाल्या. यादरम्यान किटवाड येथील महेश हेब्बाळकर, विजय लाड, आकाश पाटील या तरुणांनी धाव घेत पाचही तरुणींना बाहेर काढले. मात्र यापैकी एकाच तरुणीचा जीव वाचला असून उर्वरित चार तरुणींना आपला जीव गमवावा लागला आहे. वाचलेल्या एका तरुणीची प्रकृतीही गंभीर असून तिच्यावर बेळगावमधील केएलइ संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेत आसिया मुजावर (वय १७, रा. उज्वलनगर, बेळगाव), कुद्राशिया हासिम पटेल (वय २०) रुकसार बिस्ती (वय २०) (तिघीही राहणार अनगोळ), आणि तस्मिया बिस्ती (वय २०, रा. झटपट कॉलनी, अनगोळ, बेळगाव) अशी मृत तरुणींची नावे आहेत. या चौघींचेही मृतदेह बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते शवविच्छेदन करतेवेळी या सर्व तरुणींच्या कुटुंबीयांनी रुग्णालयासमोर जोरदार आक्रोश व्यक्त केला. दरम्यान सायंकाळी सातच्या दरम्यान सर्व मयत मुलींवर मुस्लिम स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.
किटवाड धरणावर सातत्याने अशा दुर्घटना घडत आहेत. अलीकडेच हे पर्यटन स्थळ जनतेच्या निदर्शनात आल्याने अल्पावधीतच लोकप्रिय आणि शहरापासून जवळ असल्याने नागरिकांचा ओढा येथे अधिक वाढला आहे. यामध्ये तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात असून याठिकाणी दुर्घटनेसह प्रेमीयुगुलांमुळेही स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सेल्फीच्या वेडामुळे आजवर अशा अनेक घटना घडल्या असून तरुणाईने आता स्वतःच्या अशा बेफामपणावर लगाम घालणे आवश्यक आहे. सहल, पर्यटनाचा आनंद घेताना त्या आनंदावर मोबाईल आणि सेल्फी यासह अतिमोहामुळे विरझन पडत आहे.
अशा पर्यटन ठिकाणी संबंधित विभागाच्या पोलिसांनी देखरेखीसाठी कर्मचारी तैनात करणेही आवश्यक आहे. शिवाय अशाठिकाणी योग्य बंदोबस्ताचीही मागणी करण्यात येत आहे.