सुपीक जमिनीतून जाणाऱ्या नियोजित बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गासाठी शेतकरी आपली 1 इंचही जमीन देणार नाही. राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी गरीब शेतकऱ्यांचा बळी देण्याच्या प्रयत्नात असून जर शेतकऱ्यांना त्रास द्याल तर रेल्वे मार्गच बंद पाडू असा इशारा के. के. कोप्प येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत देण्यात आला.
के. के. कोप्प (ता. जि. बेळगाव) या गावी नियोजित बेळगाव -धारवाड रेल्वे मार्ग विरोधात शेतकऱ्यांची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी हुडप्पा नंदि होते. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत आपली 1 इंच जमीन रेल्वेसाठी देणार नाही अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
स्वतःच्या स्वार्थासाठी गरीब शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न राजकीय व्यक्तीकडून होत आहे अशा प्रवृत्तीचा बैठकीत निषेध करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या शेतात रेल्वे किंवा केआयएडीबी अधिकारी अथवा कॉन्ट्रॅक्टर याना पाय ठेवायला देणार नाही अशी भूमिकाही सर्व शेतकऱ्यांनी घेतली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी दुसऱ्यांदा सर्व्हे केलेला असताना ते अंतर कमी होत असताना पहिल्या मार्गानेच मार्गानेच रेल्वे मार्ग करा असे सांगणे म्हणजे शेतकऱ्यांना देशोधडीला लावून अंगडी कुटुंबीय वयक्तिक स्वार्थ साधत असल्याचे उघड दिसून येते.
तथापी कोणत्याही परिस्थितीत त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ दिले जाणार नाही असा विश्वास शेतकरी नेत्यांनी बैठकीत व्यक्त केला. रिंग रोडमध्येही शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत, तर दुसरीकडे रेल्वे मार्ग बांधून शेतकऱ्याला देशोधडीला लावायचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मात्र जर शेतकऱ्यांना त्रास झाला तर पहिला असो किंव्हा दुसरा असो कोणताच रेल्वे मार्ग होऊ देणार नाही, असे मत प्रसाद पाटील यांनी यावेळी मांडले आणि प्रशासनाचा निर्णय ही सर्वानुमते घेण्यात आला.
बैठकीत माजी महापौर शिवाजी सुंठकर, परशराम कोलकार, प्रसाद पाटील, आर. आय पाटील, मनोज पावशे व आर. एम. चौगुले यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. येत्या 28 तारीखला रिंगरोड आणि रेल्वे मार्गाच्या विरोधात काढण्यात येणाऱ्या चाबूक मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर घेऊन सहभागी व्हावे.
या मोर्चाला किमान 25000 शेतकरी उपस्थित राहून पाठिंबा देणार आहेत असे शिवाजी सुंठकर यांनी सांगितले. चंद्रकांत कोंडुस्कर, रामदास जाधव, मारुती लोकूर, परशराम जाधव, मारुती राऊत, डुंडूने आदींसह के. के. कोप्प गावातील बहुसंख्य शेतकरी बैठकीस उपस्थित होते.