बेळगाव येथे राज्य ग्राहक आयोग (स्टेट कंझ्युमर कमिशन) सुरू करण्याची प्रलंबित मागणी तात्काळ पूर्ण करण्यात यावी अशी मागणी बेळगाव जिल्हा ग्राहक संघातर्फे एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्हा ग्राहक संघाचे अध्यक्ष ॲड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखालील वकिलांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकाने निवेदनाचा स्वीकार करून ते तात्काळ मुख्यमंत्र्यांकडे धाडण्याचे आश्वासन दिले.
या संदर्भात प्रसार माध्यमांना माहिती देताना ॲड. एन. आर. लातूर म्हणाले की, बेळगावात राज्य ग्राहक आयोग सुरू करण्यात यावा यासाठी यापूर्वी बेळगाव बार असोसिएशनच्या जवळपास 300 ते 400 वकिलांनी जवळपास एक महिनाभर तीव्र आंदोलन छेडले होते. त्यावेळी स्थानिक खासदार आणि आमदारांनी आंदोलनकर्त्या वकिलांची भेट घेऊन राज्य ग्राहक आयोग ताबडतोब बेळगावात सुरू केले जाईल, असे आश्वासन वजा वचन होते.
त्यामुळे वकिलांनीही समजूतदारपणा दाखवत आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र त्यानंतर आता 3 महिने उलटत आले तरी त्या संदर्भात कोणतीच हालचाल झालेले नाही.
तेंव्हा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी लवकरात लवकर राज्य ग्राहक आयोग बेळगावात सुरू अशी आमची विनंती आहे, असे ॲड. लातूर यांनी सांगितले. याप्रसंगी स्त्री -पुरुष वकीलवर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.