जिल्ह्यातील विविध गावातील जिल्हाधिकाऱ्यांच्या ग्रामवास्तव्य या उपक्रमांतर्गत सौंदत्ती तालुक्यातील उगारगोळ या गावात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी भेट दिली. यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी या भागातील दारू दुकानात थेट एंट्री घेत आतून दार लावून बार बंद करत धडक मोहीम आखली. स्वतःहून दारूच्या बाटल्या हातात घेऊन दारूच्या गुणवत्तेसंदर्भात अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना नमुने तपासणीसाठी दिले.
या गावातील बसवेश्वर चौकातील आनंद ब्रँडी शॉप तसेच लक्ष्मी बार अँड रेस्टोरंट ला भेट देऊन दुकानाचा परवाना, आणि उपलब्ध दारूसाठ्याच्या गुणवत्तेची पाहणी केली.
यावेळी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी दारू दुकानातील साठ्यातील नमुने तपासणीसाठी अबकारी अधिकाऱ्यांकडे सोपविले हि बाब चर्चेचा विषय ठरली. जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी दर्शन, उपविभागाधिकारी शशिधर बगली आदींचीही उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी स्वतः या ठिकाणी येऊन तपासणी करत असल्याची बाब गावातील महिलांना समजताच शेकडो महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत गावातील दारू दुकाने बंद करण्याची विनंती केली. गावात असलेली दारूची दुकाने गावाबाहेर स्थलांतरित करण्यात यावीत, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी ग्रामस्थांच्या विविध सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या. दारू दुकानांमुळे गावात उद्भवणाऱ्या समस्यांविषयी ग्रामस्थांकडून मत जाणून घेऊन योग्य पाहणी करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.