सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासह न्यायालयीन आवारातील रस्त्यांचे विकास काम हाती घेण्यात आले असले तरी त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवाराचा कायापालट करण्यात येणार असून त्या अनुषंगाने अलीकडे या ठिकाणची दुकान, कॅन्टीन वगैरेंची खोके हटविण्यात आली आहेत. नुकतेच विकास कामात अडचणीचे ठरणारे कांही वृक्ष ही हटविण्यात आले आहेत. सध्या या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम सुरू आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय व न्यायालयीन आवारात दररोज हजारो नागरिक आपापल्या कामासाठी येत असतात. त्यामुळे सदर आवारांमध्ये नेहमीच वाहनांची वर्दळ सुरू असते.
मात्र सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे येथील रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. येथील परिस्थिती पाहता या ठिकाणी रहदारी पोलिसाची नितांत गरज असल्याचे मत वाहन चालकातून व्यक्त होत आहे.
या आवारात बहुतांश ठिकाणी विकास कामे सुरू असल्यामुळे वाहने पार्क करण्यासाठी देखील जागा अपुरी पडत आहे. वाहनांच्या गर्दीमुळे चारचाकी वाहने आवारात नेताना अथवा बाहेर काढताना अडचण निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होत आहे.
तरी पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जिल्हाधिकारी कार्यालय आवारात रहदारी पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.