Friday, December 20, 2024

/

‘कस्टडी डेथ’ चौकशीसाठी सीआयडी पथक बेळगाव दाखल

 belgaum

बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कोठडीत गांजा विक्री करणाऱ्या संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या शुक्रवारी रात्री घडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाची चौकशीसह तपास करण्यासाठी बेंगळूरहून सीआयडीचे पथक आज रविवारी दुपारी बेळगावात दाखल झाले आहे.

बसनगौडा यल्लनगौडा पाटील (वय 45, रा. बल्लद बागेवाडी, ता. हुक्केरी) असे मयत संशयित आरोपीचे नांव आहे. सदर संशयिताच्या मुलीने आपल्या वडिलांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला नसून पोलीस कोठडीत झाल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी त्या संशयिताचा मृत्यू उपचारादरम्यान झाल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणी पोलीस विभाग आणि संशयितांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या परस्पर विरोधी माहितीनंतर प्रकरणाचा गुंता आणखीन वाढला आहे. मयताच्या पत्नीने बेळगाव ग्रामीण पोलिसांविरुद्ध तक्रार केल्यामुळे पोलीस आयुक्तांनी सदर प्रकरण सीआयडीकडे वर्ग केले आहे.

बसनगौडा पाटील या संशयितास गांजा प्रकरणात बेळगाव ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले होते. बेल्लद बागेवाडीहून बेळगावला येताना काकती जवळ बसनगौडा याला घाम आल्यामुळे स्थानिक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार त्यावेळी डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली होती. प्रकृती स्थिरावल्यानंतर त्याला बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी त्याला उलट्या झाल्याने आणि घाम येत असल्याने पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.

सदर प्रकरणाची पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. मृताच्या पत्नीकडून फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. पुढील तपासासाठी प्रकरण बंगळुरूला पाठवण्यात येणार असल्याची माहिती त्यानंतर पोलीस आयुक्तांनी दिली होती.

Rural ps
Belgaum rural police station

याप्रकरणी मृत आरोपीच्या कुटुंबीयांनी मात्र पोलिसांना दोषी ठरविले आहे. कोणतीही माहिती न देता खोटा गुन्हा दाखल करून आपल्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले तसेच पोलिसांच्या छळामुळेच आपल्या वडिलांचा लॉकअपमध्ये मृत्यू झाल्याचा आरोप मयत बसनगौडा पाटील याची मुलगी रोहिणी हिने केला आहे. आपले वडिल हॉस्पिटलमध्ये जिवंत असल्याचे प्रथम सांगण्यात आले होते. मात्र थोड्या कालावधीनंतर रात्री आपल्याला पोलिसांनी फोन करून वडिलांचा मृतदेह घेऊन जाण्याबाबत सांगितले होते, अशी धक्कादायक माहिती तिने दिली आहे. आपण पॅरामेडिकलची विद्यार्थिनी असून ज्यावेळी रुग्णालयात आपण स्टेथेस्कोप घेऊन तपासणी केली, त्यावेळी त्यांच्या हृदयाचे ठोके आपल्याला जाणवले नाहीत. वडिलांच्या हाताला दोरीने बांधल्याच्या खुणा देखील आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू हा पोलीस कोठडीतच झाला आहे, असा आरोप रोहिणी हिने केला आहे. ही सर्व माहिती शवविच्छेदना दरम्यान आपण न्यायाधीशांना सांगितली, त्यावेळी न्यायाधीशांनी पोलिसांना चांगलेच धारेवर धरले. आता माझ्या वडिलांना न्याय वेळेपर्यंत मी कायदेशीर लढा सुरू ठेवणार आहे अशी माहितीही तिने दिली आहे. एकंदर पोलीस विभागाने दिलेले स्पष्टीकरण आणि मृतांच्या कुटुंबियांकडून करण्यात आलेला आरोप यामुळे हे प्रकरण गुंतागुंतीचे झाले असून अंतिम चौकशीनंतर यामागील सत्य बाहेर येईल, अशी आशा आहे.

दरम्यान, पोलीस कस्टडीमध्ये बसनगौडा यल्लनगौडा पाटील याचा मृत्यू झाल्या प्रकरणाची गंभीर दखल घेत आज रविवारी दुपारी बेंगळूरहून सीआयडीचे पथक चौकशीसाठी बेळगावात दाखल झाले आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आज रविवारी सायंकाळी ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन चौकशीसह तपास सुरू केला आहे. त्याच्यामुळे आता सीआयडी चौकशी आणि तपासाअंती लवकरच या ‘कस्टडी डेथ’ प्रकरणावर अधिक प्रकाश पडून संशयित आरोपीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? या संदर्भातील सत्य उजेडात येणार आहे.दरम्यान बेळगाव ग्रामीण पोलिस स्थानकात याअगोदर झालेल्या प्रकरणाची चर्चा जोरदार सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.