बेळगाव उपनोंदणी कार्यालयामध्ये विवाह नोंदणी वेळी 500 हून अधिक बोगस चलन देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार या कार्यालयाच्या लेखापरीक्षणात उघडकीस आला आहे. याखेरीज कार्यालयाकडून एक बोगस मिळकत बोजा प्रमाणपत्रही वितरित करण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.
खरेदी विक्री व्यवहाराचा दस्त तयार करताना 16 लाख रुपयांचे बोगस केटू चलन देण्यात आल्याचा प्रकार दोन आठवड्यापूर्वी बेळगावच्या उपनोंदणी कार्यालयात उघडकीस आला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर लगेचच उपनोंदणी कार्यालयाचे लेखापरीक्षण सुरू झाले.
आता त्याच लेखापरीक्षणामध्ये विवाह नोंदणीतील बोगस चलन घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. उप नोंदणी कार्यालयातील विवाह नोंदणी विभागात एकही नियमित कर्मचारी नाही. त्या विभागाचे कामकाज एजंटांकडूनच चालविले जाते. त्याचा फायदा घेत विवाह नोंदणी शुल्क भरण्यासाठीचे बोगस चलन तयार करून ते जोडण्यात आले आहे.
विवाह नोंदणीची संख्या व जमा झालेली शुल्क रक्कम यांचा ताळमेळ लेखा परीक्षणात बसला नसल्यामुळेच हे बोगस चलन प्रकरण उघडकीस आले आहे.
विवाह नोंदणीसाठी 350 रुपये शुल्क घेतले जाते, मात्र एजंटांकडून 1200 ते 1500 रुपये उकळले जातात. त्यातील 350 रुपयांचे चलन जोडणे आवश्यक आहे. तथापि तेही बोगस जोडले जात असल्यामुळे उपनोंदणी कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे.
या बोगस चलन प्रकरणा व्यतिरिक्त बेळगाव दक्षिण उपनोंदणी कार्यालयाकडून एक बोगस मिळकत बोजा पत्र (एन्कम्बरन्स सर्टिफिकेट) देखील वितरित करण्यात आले असून त्याची चौकशी भूमी अभिलेखा खात्याकडून करण्यात येत आहे.
या चौकशीत ज्या मिळकतीचे बोगस प्रमाणपत्र देण्यात आले आहे, ती मिळकत भलत्याच व्यक्तीच्या नावे असल्याचे समोर आले आहे. या पद्धतीने बेळगाव उपनोंदणी कार्यालयातील घोटाळे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.