बेळगावमध्ये येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी शहर परिसरातील 83 हॉटेल्स मधील एकूण 2,140 खोल्या आरक्षित करण्यात आल्या असून वरिष्ठमंत्र्यांच्या निवासासाठी विविध शिक्षण संस्थांचे चार गेस्ट हाऊस देखील प्रशासनाकडून ताब्यात घेतले जाणार आहेत.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच झालेल्या हॉटेल मालकांच्या बैठकीत 83 हॉटेलमधील 90 खोल्या आरक्षित ठेवल्या जातील असे सांगण्यात आले होते.
मात्र महापालिकेने संबंधित हॉटेल्स मधील सर्वच खोल्या आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. याखेरीज महापालिकेला आणखी 60 खोल्या आरक्षित करणार असून त्यासाठी शोध सुरू आहे. महापालिकेचे अधिकारी सातत्याने हॉटेल मालकांच्या संपर्कात असून 18 ते 31 डिसेंबर या काळात हॉटेलमधील खोल्या अन्य कोणासाठी ही आरक्षित केल्या जाऊ नये अशी सूचना त्यांना दिली जात आहे.
बेळगावमध्ये येत्या 19 ते 30 डिसेंबर या काळात विधिमंडळ अधिवेशन होणार असले तरी 18 ते 31 डिसेंबर पर्यंत हॉटेल खोल्यांचा कब्जा महापालिकडे असणार आहे. परिणामी यावर्षी 31 डिसेंबरला नववर्ष स्वागत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात हॉटेल मालकांना अडचण येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच मात्र 24 डिसेंबर रोजी अधिवेशन समाप्त झाले होते.
त्यावेळी हॉटेल मालकाने 90 टक्के खोल्या अधिवेशनासाठी दिल्या होत्या, तर 10 टक्के खोल्या आपल्या नेहमीच ग्राहकांसाठी राखीव ठेवल्या होत्या.
दरम्यान, अधिवेशन काळात संबंधित हॉटेल्स मध्ये अन्य कोणासाठी खोली उपलब्ध करून द्यायची झाली तर त्यासाठी महापालिकेकडून किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून आगाऊ परवानगी घ्यावी लागणार आहे, तशी सूचना हॉटेल मालकांना देण्यात आली आहे.