बेळगाव महापालिकेने 58 पथकांची स्थापना करण्याद्वारे बेळगाव शहरातील नव्या मिळकतींचा शोध घेऊन त्यांचे फेरमूल्यमापन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्या आदेशावरून येत्या 31 डिसेंबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे.
महापालिकेच्या महसूल विभागातून मिळालेल्या माहितीनुसार शहरात सुमारे 1 लाख 41 हजार मिळकती आहेत. मात्र अनेक मिळकतींची नोंद महापालिकेकडे झालेले नाही. शासनाने अशा मिळकतींचा शोध घेण्याचा आदेश बेळगाव महापालिकेसह सर्वच नगर स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे.
त्या मिळकतींची नोंद केएमएफ 24 नामक नोंदवहीत करण्यास सांगण्यात आले आहे. बेळगाव महापालिकेकडून याबाबतचे सर्वेक्षण सुरू आहे. प्रारंभी ही जबाबदारी महसूल कर्मचाऱ्यांकडे होती मात्र महसूल कर्मचाऱ्यांकडून निर्धारित वेळेत हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे नगर विकास खात्याची नाराजी ओढवून घ्यावी लागली होती.
आता नव्या मिळकतींचा शोध व त्याचे फेरमूल्यमापन करण्यासाठी 58 पथकांची स्थापना करून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या पथकांमध्ये सर्व विभागातील प्रथम दर्जा सहाय्यक, द्वितीय दर्जा सहाय्यक, कनिष्ठ अभियंते आदींचा समावेश आहे.
या पथकातील कर्मचाऱ्यांना दररोज सकाळपासून दुपारपर्यंत सोपवलेले काम करावे लागणार आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत महापालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळकतींचे फेरमूल्यमापन करण्याची ही मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी महसूल उपायुक्त व महसूल अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.