Wednesday, January 8, 2025

/

हिंडलग्यात कचरा फेकणाऱ्यांवर आजपासून कॅमेऱ्यांची नजर

 belgaum

हिंडलगा ग्रामपंचायत परिसरात सार्वजनिक ठिकाणी रस्त्याकडेला अथवा कोपऱ्यावर कचरा फेकण्याच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांच्या संकल्पनेतून गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना साकारण्यात आली असून हे सर्व कॅमेरे आजपासून कार्यान्वित झाले आहेत. आता सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्यांकडून 5000 रु. दंड वसूल केला जाणार आहे.

हिंडलगा ग्रामपंचायत परिसरात सार्वजनिक ठिकाणी रस्त्याकडेला गावातील तसेच आसपासच्या गावातील नागरिकांकडून कचरा फेकण्याद्वारे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण केली जात आहे. या गैरप्रकाराला आळा घालून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आता हिंडलगा ग्रामपंचायतीचे अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी कंबर कसली आहे.

त्यासाठी नागरिक कचरा ज्या ठिकाणी फेकतात त्या सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना राबविण्याचा निर्णय मन्नोळकर यांनी घेतला. त्यानुसार अध्यक्ष मन्नोळकर यांच्यासह उपाध्यक्ष भाग्यश्री कोकितकर, रामचंद्र मन्नोळकर आदींसह ग्रा. पं. सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या उपस्थितीत गेल्या मंगळवारी (22 रोजी) गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम नुकतेच पूर्ण झाले असून सर्व कॅमेरे आज बुधवारपासून कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे कचरा फेकणाऱ्यांवर या कॅमेर्‍यांची करडी नजर असणार आहे.Cctv

हिंडलगा गावात अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी गावातील लक्ष्मीची गदग, कलमेश्वर मंदिर, मराठी शाळा हिंडलगा, फॉरेस्ट चेक पोस्ट पाठीमागे, केंबळी नाका, लेप्रसी हॉस्पिटल, साई मंदिर, मराठी शाळा विजयनगर, गणेशपुर रोड, लक्ष्मीनगर आदी वेगवेगळ्या 12 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या सहाय्याने ग्रामपंचायत कचरा फेकणाऱ्याकडून 5000 रु. दंड वसूल करणार आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे. सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकू नये, असे आवाहन हिंडलगा ग्रा. पं. अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी केले आहे.

गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून राबविण्यात येत असलेल्या या योजनेचे सर्वत्र स्वागत होत असून मन्नोळकर यांची प्रशंसा होताना दिसत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.