हिंडलगा ग्रामपंचायत परिसरात रस्त्याकडेला कचरा फेकण्याच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा तसेच कचरा फेकणाऱ्याला 5000 रु. दंड करण्याचा निर्णय हिंडलगा ग्रामपंचायतने घेतला आहे. त्यानुसार आज मंगळवारी ग्रामपंचायतीतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
हिंडलगा ग्रामपंचायत परिसरात सार्वजनिक ठिकाणी रस्त्याकडेला गावातील तसेच आसपासच्या गावातील नागरिकांकडून कचरा फेकण्याद्वारे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण केली जात आहे. या गैरप्रकाराला आळा घालून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आता हिंडलगा ग्रामपंचायतीने कंबर कसली आहे.
त्यासाठी नागरिक कचरा ज्या ठिकाणी फेकतात त्या सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबरोबरच कचरा फेकणाऱ्याकडून 5000 रु. दंड वसूल केला जाणार आहे. सदर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ आज मंगळवारी हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर आणि उपाध्यक्ष भाग्यश्री कोकितकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी ग्रा. पं. अध्यक्ष मन्नोळकर यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा हेतू स्पष्ट केला. रामचंद्र मन्नोळकर, मिथुन उसुलकर, आरती कडोलकर, पांडुरंग गावडे, शिवाजी चौगुले, संगीता पलंगे, संभाजी चौगुले, कुमार उसूलकर, संतोष पिल्लाई, परशुराम येळ्ळूरकर, फ्रॅंकी पिल्लाई, अनिल अष्टेकर आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर याप्रसंगी उपस्थित होते.