बेळगाव लाईव्ह : सांगली जिल्ह्यातील जत तालुका कर्नाटकात समाविष्ट करावा असे विधान करणाऱ्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरुवात झाली आहे.
सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली याचिका अंतिम टप्प्यात येत असून नेहमीप्रमाणे आडमुठे धोरण राबविणाऱ्या कर्नाटकाकडून पुन्हा व्यत्यय आणण्यासाठी हे विधान करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बसवराज बोम्मई यांनी केलेल्या विधानानंतर आज निपाणी-औरंगाबादसाठी धावणाऱ्या निपाणी आगारातील कर्नाटक परिवहनच्या बसवर महाराष्ट्रात काळ्या शाईने निषेध नोंदविण्यात आला आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक परिवहनच्या बसवर काळ्या शाईने जाहीर निषेध नोंदवत संताप व्यक्त केला आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून सीमाप्रश्नी नेहमीच होणाऱ्या बेताल वक्तव्यांचा एक भाग असलेल्या या विधानावरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. २०१२ साली दुष्काळग्रस्त जत तालुक्याने कर्नाटकाच्या सीमेवरील गावात होत असलेल्या पाणीपुरवठावरून महाराष्ट्र सरकारचे डोळे उघडण्यासाठी कर्नाटकात सामील होण्याचे ठराव मंजूर केले होते. हि एकाच बाब हेरून जुन्या गोष्टी उकरून काढत कर्नाटकाने आता जतवरच आपला हक्क सांगण्याची केविलवाणी हरकत सुरु केली आहे.
काही प्रसारमाध्यमांनी बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर जत तालुक्यातील गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी तेथील नागरिकांनी जतमधील परिस्थिती सांगितली. शिवाय आपण महाराष्ट्रात आहोत, याचा आपल्याला अभिमान असून याठिकाणी होत नसलेल्या विकासामुळे काहीठिकाणी ठराव पास झाल्याचे सांगितले.
जत तालुका महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तालुक्यांमधील एक तालुका असून याठिकाणी विकासनिधी पोहोचण्यात वेळ लागतो यामुळे हा तालुका विकासापासून काहीसा वंचित आहे. कर्नाटक – महाराष्ट्राच्या सीमेवरील या
तालुक्याच्या अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर कर्नाटकाची सीमा आहे. कर्नाटकाच्या सीमेवरील गावांमध्ये मुबलक पाणी मिळते पण जत तालुक्याला मिळत नसल्याने व्याकुळ झालेल्या जतवासीयांनी २०१२ साली सदर ठराव मंजूर केले होते.
परंतु हळूहळू याठिकाणी रीतसर सुविधा पोहोचत असून केवळ ठरावाचे भांडवल करून सीमाप्रश्नी मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री बोम्मई यांनी केला. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यांचा निषेध नोंदविण्यात येत आहे.