बेळगाव जिल्हा हा भौगोलिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असला तरी आणि राज्यात व केंद्रात डबल इंजिन सरकार असले तरी बेळगाव जिल्ह्यावर अन्याय करताना अनेक महत्त्वाच्या योजना हुबळी -धारवाडकडे वळविल्या जात आहेत. याबाबतीत बेळगाव जिल्ह्यातील भाजप नेते बेळगावला न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरले आहेत, असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते राजीव टोपण्णावर यांनी केला आहे.
बेळगाव येथे आज गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. बेंगलोर येथून बेळगावपर्यंत आणावयाची वंदे भारत रेल्वे हुबळीलाच थांबविण्यात आली आहे. बेळगावसाठी घोषित करण्यात आलेला 150 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्सलन्स सेंटरचा प्रकल्प धारवाड जिल्ह्यात हलविण्यात आला.
एवढेच नव्हे तर अनेक महत्त्वाच्या योजना शेजारील जिल्ह्यांकडे वळविण्यात आल्या तरी बेळगाव जिल्ह्यातील भाजप नेत्यांना त्याचा पत्ता देखील नाही ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे टोपण्णावर यांनी सांगितले.
बेळगाव -धारवाड -हुबळी यांच्यासाठी स्टार्ट अप क्लस्टर उभारण्यात येणार असले तरी या योजनेची सर्व कामे फक्त हुबळी येथेच सुरू आहेत. या योजनेचे मुख्य केंद्र हुबळी बनले असून सर्व निर्णय हुबळी -धारवाड येथील नेते मंडळी घेत आहेत. या पद्धतीने एकंदरच बेळगाव जिल्ह्यावर मोठा अन्याय झाला आहे.
अनेक विकास योजना बेळगावतून हुबळीला शिफ्ट होत आहेत. हे घडत असताना दुर्दैवाने बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस आणि भाजपचे नेते मात्र केवळ धार्मिक मुद्दे समोर ठेवून आंदोलना करत आहेत. काँग्रेस व भाजप नेते जनतेच्या भावनांशी खेळून त्यांची दिशाभूल करत आहेत असा आरोप करत राजीव टोपण्णावर यांनी जिल्ह्यातील काँग्रेस व भाजप नेत्यांवर कडाडून टीका केली.