बुधवारी (दि. ३०) जिल्हा पंचायत सभागृहात जिल्हास्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी जिल्हास्तरीय तांत्रिक तज्ञ समितीचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अल्पमुदतीच्या पीक लागवडीसाठी लागवडीचे प्रमाण निश्चित करण्यासंदर्भात सूचना केल्या.
जिल्हाधिकारी नितेश पाटील बोलताना म्हणाले, मागील वर्षी शिफारस करण्यात आलेल्या अल्प मुदतीच्या लागवडीचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढविले जाईल. २०२२३-२४ या वर्षासाठी नाबार्डकडून तयार करण्यात आलेल्या १९६१४.४५ कोटी रुपयांची संभाव्य क्रेडिट लिंक्ड योजना कार्यान्वित करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
नाबार्डच्या मूल्यांकनानुसार जिल्ह्यातील प्राधान्य क्षेत्रासाठी जिल्ह्याची एकूण कर्ज क्षमता १९६१४.४५ कोटी इतकी असून यापैकी लागवडीसाठी ९७८०.४१ कोटींची कृषी कर्ज क्षमता उपलब्ध करून देण्याची संधी मिळाली आहे.
शेतकऱ्यांनी स्वतः बँकेकडून कर्ज घ्यावे, खाजगी सावकार आणि चक्रवाढ व्याजाच्या पाशात अडकून अडचणी ओढवून घेऊ नयेत, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यावेळी बँक कर्ज व्यवहाराबद्दलची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
या बैठकीला कृषी विभागाचे सहसंचालक शिवनगौडा पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे एल डी सी एम सुधींद्र कुलकर्णी, बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी व जिल्हास्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीचे सदस्य सचिव कलावंत, डीसीसी बँकेसह विविध बँकेचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.