लोकशाही मार्गाने कायदा व सुव्यवस्थेला धक्का न लावता शांततापूर्ण निषेध करण्यास कोणताही अडथळा नाही. मात्र त्याचा कुणालाही त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या महामेळाव्याच्या मुद्द्यावर बोलताना स्पष्ट केले आहे.
कर्नाटक सरकारच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगाव होत आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून सीमा प्रश्नी दोन्ही राज्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी निपाणी येथे पोलीस अधिकाऱ्यांची बॉर्डर मीटिंग घेतली. त्यानंतर पोलीस मुख्यालय आणि पोलीस आयुक्तालय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत दरम्यान त्यांनी बंदोबस्ताचा आढावा घेताना उपरोक्त स्पष्टीकरण केले. बेळगाव मध्ये येत्या 19 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे.
या अधिवेशनादरम्यान विविध संघ संस्थांच्यावतीने आंदोलने करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये. कोणतेही नुकसान होऊ नये. यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाईल. बंदोबस्तासाठी 4000 पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे.
एकूण 35 तुकड्या तैनात आहेत. सात -आठ जिल्हा पोलीस प्रमुख, 38 पोलीस उपाधीक्षक, 80 पोलीस निरीक्षक अधिवेशन काळात नियुक्त करण्यात येणार आहेत. अधिवेशन शांततेत पार पडावे यासाठी सर्व उपाययोजना करणार असल्याचे अलोक कुमार यांनी छप्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
याचवेळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मराठी भाषिक महामेळावा आयोजित करणार असल्याच्या मुद्द्यावर बोलताना अलोककुमार यांनी शांततापूर्ण निषेध करण्यास कोणताही अडथळा नाही. मात्र त्याचा कुणालाही त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले.