जुन्या पी. बी. रोडवरील छ. शिवाजी रेल्वे ओव्हर ब्रिजच्या जिजामाता चौकाकडील टोकाशी रस्त्यावर पडलेल्या धोकादायक खड्ड्यांमध्ये चक्क नारळाचे झाड लावून शहर प्रशासन व स्मार्ट सिटी लिमिटेडचा धिक्कार केला जात आहे.
जुन्या पी. बी. रोडवरील छ. शिवाजी रेल्वे ओव्हर ब्रिज जिजामाता चौकाच्या बाजूला ज्या ठिकाणी समाप्त होतो त्या ठिकाणी रस्त्यावर धोकादायक खड्डे पडले आहेत. ब्रिजच्या पायथ्याशी असलेले हे खड्डे ओलांडताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते.
नवख्या वाहनचालकांसाठी रात्रीच्या वेळी हे खड्डे मृत्यूला आमंत्रण देणारे ठरू शकतात. सदर मृत्यूचे सापळे बनवून पाहणारे हे खड्डे बुजवून ब्रिजचा रस्ता दुरुस्त करावा अशी वारंवार मागणी करून देखील महापालिका, सार्वजनिक बांधकाम खाते आणि बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड त्याकडे साफ दुर्लक्ष करत आहे. छ. शिवाजी रेल्वे ओव्हर ब्रिज येथील रस्ता दुरुस्तीकडे केले जाणारे दुर्लक्ष पाहता स्मार्ट सिटी ही योजना नागरिकांच्या हितासाठी आहे? की त्यांचा कपाळमोक्ष होण्यासाठी आहे? असा संताप सवाल केला जात आहे.
यासाठीच सदर ब्रिजच्या आसपासचे नागरिक, व्यावसायिक व दुकानदारांनी गांधीगिरी करत प्रशासनाला जागे करण्यासाठी आज शुक्रवारी सकाळी ब्रिजच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये नारळाचे झाड लावून निषेध व्यक्त केला.
तेंव्हा बेळगाव उत्तरच्या आमदारांसह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.