ऐन दिवाळीत एक विलक्षण खगोलीय घटना आज मंगळवारी सायंकाळी घडणार असून संध्याकाळी सुमारे 4 वाजून 50 मिनिटानंतर पश्चिमेच्या क्षितिजावर खंडग्रास सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य आपल्या सर्वांना पाहता येणार आहे.
बाजारात मिळणाऱ्या सोलार एक्लिप्स गॉगल आणि दुर्बिणीच्या सहाय्याने नागरिक हे सूर्यग्रहण पाहू शकतील. या ग्रहणाचा अभ्यास आणि आनंद लुटण्यासाठी देशातील विविध खगोल प्रेमी संस्था आणि महाविद्यालयाने ग्रहण पाहण्यासाठी व्यवस्था केली आहे.
मान्सून वेळेत परतल्याने आकाश आता निरभ्र असून सर्वानाच आता हे खंडग्रास सूर्यग्रहण स्पष्ट पाहता येणार आहे. आज सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास ग्रहणाला सुरुवात झाल्यानंतर पावणेसहाच्या सुमारास सूर्य सर्वाधिक व्यापला जाईल. सायंकाळी सहानंतर ग्रहण सुटेल.इ
चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्राची गोलाकार गडद सावली पृथ्वीवर पडते. यालाच आपण सूर्याला ग्रहण लागले असे म्हणतो. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आणि पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे ही सावली वेगाने जमिनीवरून प्रवास करते.
पृथ्वीच्या ज्या भागावरून ही सावली प्रवास करते त्या भागामध्ये खग्रास किंवा खंडग्रास सूर्यग्रहण बघायला मिळते. खगोलशास्त्रज्ञांच्या मते आजच्या खंडग्रास सूर्यग्रहणानंतर असा योग पुढील 10 वर्षे येणार नाही.