आई मी आता बरा झालोय असे जेंव्हा माझा मुलगा स्वतःच्या तोंडाने म्हणेल तेंव्हाच खऱ्या अर्थाने माझी दिवाळी साजरी होईल, हे उद्गार आहेत रोहिणी चंद्रकांत तेंडुलकर या 64 वर्षीय महिलेचे. ज्यांचा 34 वर्षीय मुलगा औदुंबर उर्फ आकाश अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे 3 वर्षापासून अंथरुणाला खिळून आहे.
गरिबी रेषेखालील कुटुंबातील असलेल्या रोहिणी तेंडुलकर आपला जखमी मुलगा आकाश याला बरे करण्यासाठी अक्षरशा जिवाचा आटापिटा करत आहेत. आपल्या मुलाला बरे होऊन सर्वसामान्य जीवन जगता यावे यासाठी स्वतःचे घर विकण्यापासून कोणतेही प्रयत्न त्यांनी करायचे सोडले नाहीत.
रोहिणी यांच्या हृदयद्रावक परिस्थितीची कल्पना असलेल्या लोकांनी त्यांना आपल्यापरीने सहाय्य करणे सुरू ठेवले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वारंवार विनंती करून देखील सरकार आणि लोकप्रतिनिधींनी मात्र अद्यापही रोहिणी तेंडुलकर यांना सहाय्य केलेले नाही.
मुंबई येथे एका खाजगी कंपनीत काम करत असताना 2019 साली एका अपघातात गंभीर जखमी होऊन दिगंबर उर्फ आकाश कोमामध्ये गेला. उपचार करणाऱ्या तेथील हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तुमचा मुलगा जगणे कठीण आहे असे रोहिणी यांना सांगितले. तेंव्हा त्यांनी आकाशला माघारी बेळगावला आणून एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
मुलाच्या उपचारासाठी घरदार विकणाऱ्या रोहिणींना स्थानिक बिगर सरकारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स आणि हितचिंतकांनी आपल्या परीने मदत केली असली तरी मुलाच्या उपचारासाठी त्यांना अद्यापही मदतीची गरज आहे. क्लिष्ट सरकारी प्रक्रियेमुळे आपल्याला ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारे निवृत्तीवेतनही मिळत नाही. ते मिळाल्यास आमचे जगणे थोडे तरी सुसह्य होईल, असे रोहिणी यांनी सांगितले.
रोहिणी यांचे पती चंद्रकांत हे एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड होते. गेल्या 2012 साली त्यांचे निधन झाले. रोहिणी सध्या मंडोळी रोड भवानीनगर येथे आपल्या नातलगांच्या घरात राहत आहेत. बऱ्याच उपचारानंतर आकाश डोळे उघडून पाहू लागला असला तरी बोलू शकत नाही.
हे फक्त आमचे नातलग आणि हितचिंतकांमुळे घडले आहे. तथापि माझी दिवाळी तेंव्हाच साजरी होईल जेव्हा आकाश मला आई म्हणून हाक मारेल, असे रोहिणी तेंडुलकर म्हणतात.