घरातून बेपत्ता झालेल्या अथणी येथील एका इसमाला सेवाभावी संघटना एफएफसीचे प्रमुख संतोष दरेकर यांनी आपले सहकारी मित्र आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने सुखरूप स्वगृही धाडल्याची घटना आज घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, सामाजिक कार्यकर्ते फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे (एफएफसी) प्रमुख संतोष दरेकर यांची आज सकाळी महर्षी रोड टिळकवाडी येथे एका भिक्षुक सदृश्य वयस्कर इसमाशी गाठ पडली. त्या असहाय्य इसमाने आपण उपाशी असून काहीतरी खावयास द्या अशी विनंती दरेकर यांना केली.
तेव्हा दरेकर यांनी त्या इसमाला स्वतःच्या घरी नेऊन त्याची विचारपूस केली आणि त्याला खाऊपिऊ घातले. तत्पूर्वी हात पाय स्वच्छ धुवावयास लावून त्याला स्वतःकडील टी-शर्ट व पॅन्ट परिधान करण्यास दिली. त्यावेळी त्या इसमाचे नांव महबूब मुल्ला असे असल्याचे समजले. तसेच आपण कलाल गल्ली, अथणी येथील जक्कीन मठानजीक रहात असल्याचे त्यावेळी महबूबने सांगितले.
संतोष दरेकर यांनी मेहबूबकडून त्याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर कॅम्प येथील कट अँड क्युट मेन्स सलूनमध्ये त्याची कटिंग व दाढी करून घेतली. तसेच त्यानंतर त्याला पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्याच्या स्वगृही अथणीला धाडण्याची व्यवस्था केली.
यासाठी त्यांना कॅम्प येथील सामाजिक कार्यकर्ते वासिम बेपारी यांचेही सहकार्य लाभले. बेपत्ता मेहबूब मुल्ला याच्या घरी त्याची आई, पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. मेहबूब सुखरूप खरी परतल्याने मुल्ला कुटुंबीयांना अत्यानंद झाला असून त्यांनी संतोष दरेकर यांचे आभार मानले आहेत.