असंख्य भक्तांच्या सहभागाने मंगळवार दि. ११ ऑक्टोबर रोजी श्री पंत महाराजांच्या ११७व्या पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ झाला. श्री दत्त प्रेमलहरींसह प्रेमध्वज मिरवणुकीने पुण्यतिथी उत्सवाची सुरुवात करण्यात आली.
समादेवी गल्ली येथील श्री पंत वाड्यातून सकाळी ८ वाजता श्री पंत मंदिरात धार्मिक विधी व पंत प्रतिमेचे पूजन करून प्रेमध्वज मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. श्री पंत महाराज रचित श्री दत्त प्रेमलहरीतील विविध पदे गात असंख्य भक्तांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला.
प्रेमध्वज मिरवणुकीला समादेवी गल्लीतून सुरुवात झाली. यानंतर सदर मिरवणूक खडेबाजार येथून विविध मार्गांवरून बेळगावातून श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्रीकडे रवाना झाली. यावेळी भक्तांनी श्री पंत महाराज आणि श्री दत्तगुरुंचा अखंड जयघोष केला. सायंकाळी श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील पंत वाड्यात मिरवणूक पोहोचल्या नंतर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
आजपासून सुरु झालेला श्री पंत महाराज पुण्यतिथी सोहळा गुरुवार दि. १३ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन, टिपरी सोहळा आदींचे आयोजन करण्यात आले आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने हा सोहळा साजरा करण्यात आला होता. यंदा हा सोहळा भव्य प्रमाणात साजरा करण्यात येत आहे.बेळगावबरोबरच कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा आदी राज्यात पंत महाराजांचा मोठा भक्त संप्रदाय आहे. त्यामुळे विविध ठिकाणाहून लाखो भक्त श्री पंत महाराजांच्या दर्शनासाठी बेळगावमध्ये दाखल होतात.
यंदाचा सोहळा ३ दिवस चालणार असून यावर्षी लाखो भक्त या सोहळ्यात सहभागी होण्याचा अंदाज आहे. या सर्वांसाठी अल्पोपहार, भोजन आणि दवाखान्याची व्यवस्था श्री दत्त संस्थान, पंत बाळेकुंद्री यांच्यावतीने करण्यात आली आहे.परिवहन मंडळानेही बेळगावच्या सीबीटी स्थानकापासून पंत बाळेकुंद्री येथे दररोज अतिरिक्त ३० बसफेऱ्यांची सेवा सुरु केली आहे.