नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी सणानिमित्त उभारण्यात आलेली श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेची स्वागत कमान पूर्वकल्पना न देता अचानक हटविण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळे कांही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची घटना शहापूर खडेबाजार येथे आज सकाळी घडली.
गणेश उत्सवात देखील श्रीराम सेनेकडून लक्षवेधी कमानी उभे करण्यात आल्या होत्या नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी सणानिमित्त शहरात ठिकठिकाणी मोक्याच्या जागी लोकप्रतिनिधी आणि सेवाभावी सामाजिक संघटनांनी स्वागत कमानी उभारल्या आहेत. त्याच पद्धतीने श्रीराम सेना हिंदुस्तान संघटनेच्यावतीने शहापूर खडेबाजार येथे उभारण्यात आलेली भव्य स्वागत कमान कमान काढण्यासाठी आज सकाळी महापालिकेचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले.
कोणतीही पूर्वसूचना न देता महापालिकेचे कर्मचारी स्वागत कमान हटविण्यास आले असल्याची माहिती वाऱ्यासारखी स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये पसरताच त्यांच्यात एकच खळबळ उडाली आणि त्यांनी स्वागत कमानीच्या ठिकाणी धाव घेऊन कमान हटवण्यास तीव्र विरोध केला. आम्ही रीतसर परवानगी घेऊन दसरा आणि दिवाळी सणासाठी ही स्वागत कमान उभारली आहे असे सांगून कोणतीही पूर्व सूचना देता तुम्ही कमान कशी काय हटवू शकता? असा जाब कार्यकर्त्यांनी विचारला. त्यावेळी आम्हाला वरून आदेश आहे. त्यामुळे आम्ही ही स्वागत कमान हटवण्यास आलो आहोत असे उपस्थित मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले त्यावरून उभयता जोरदार वादावादी होऊन परिसरात सकाळी सुमारे पाच-सहा तास तणावाचे वातावरण पसरले होते.
याबाबतची माहिती मिळताच मनपा आयुक्त आणि उपायुक्तांनी घटनास्थळी धाव घेऊन कार्यकर्त्यांची समजूत काढली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले होते. अखेर जवळपास 6 तासानंतर दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कार्यकर्ते आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यात सामंजस्याने चर्चा होऊन सर्वानुमते स्वागत कमान हटविण्यात आल्याने परिस्थिती निवळली.
या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना शहापूर खडेबाजार येथील श्रीराम सेना हिंदुस्थानच्या एका कार्यकर्त्याने सांगितले की, तीन दिवसांपूर्वी स्वागत कमान हटवण्याची नोटीस देण्यात आली होती असे महापालिका अधिकारी सांगत आहेत. मात्र आम्हाला तशी कोणतीच नोटीस मिळालेली नाही. या खेरीज नवरात्र, दसरा आणि दिवाळीनिमित्त शहरात अनेक ठिकाणी स्वागत कमानी आणि बॅनर्स उभारण्यात आले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून नेमके खडेबाजार येथील श्रीराम सेना हिंदुस्तानची स्वागत कमानीला हेतूपुरस्सर लक्ष्य केले जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोपही त्याने केला. तसेच अचानक स्वागत कमान हटविण्याच्या महापालिकेच्या कृतीबद्दल त्या कार्यकर्त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली.