बेळगाव लाईव्ह विशेष /नेहरूनगर येथील नेहरू स्टेडियम अर्थात जिल्हा क्रीडांगण हे अलीकडच्या काळात खेळांसाठी वापरण्याऐवजी सभासमारंभा सारख्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी वापरण्यात येत असल्यामुळे तेथील मैदानाची पार दुरवस्था झाली आहे. जिल्हा क्रीडांगणावरील लाखो रुपयांच्या सिंथेटिक ट्रॅकचे तर अक्षरशा तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे क्रीडापटूनसह क्रीडा प्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे
केंद्र आणि राज्य सरकार अनेक क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी देखील विविध योजना राबवत असते. त्याच अनुषंगाने बेळगावमध्ये दोन दशकांपूर्वी नेहरूनगर येथे कोट्यावधी रुपये खर्च करून डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स (नेहरू) स्टेडियम अर्थात जिल्हा क्रीडांगण उभारण्यात आले. या क्रिडांगणाच्या उभारणीमुळे जिल्ह्यातील विशेष करून बेळगाव शहरातील क्रीडापटूंमध्ये नवा उत्साह आणि चैतन्य निर्माण झाले. त्यानंतर कांही वर्षात स्थानिक खेळांचा विशेष करून ॲथलेटिक प्रकाराचा दर्जा सुधारून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ॲथिलिट बेळगावात निर्माण व्हावे या उद्देशाने सदर क्रीडांगणावर सिंथेटिक ट्रॅक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी करताना साधारण 2008 -09 यादरम्यान लाखो रुपये खर्च करून जिल्हा क्रीडांगणावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक ट्रॅक बसविण्यात आले. त्याचप्रमाणे हे ट्रॅक खराब होऊ नये यासाठी या मैदानावर क्रीडा प्रकार वगळता कोणत्याही कार्यक्रम अथवा सभा समारंभाचे आयोजन केले जाऊ नये असा फतवाही काढण्यात आला.
दर्जेदार सिंथेटिक ट्रॅक उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक क्रीडापटू देखील त्या ठिकाणी मोठ्या जोमाने सरावाला लागले. मात्र कालांतराने येरे माझ्या मागल्या.. अशी परिस्थिती होऊन या क्रीडांगणावर कार्यक्रम, सभा-समारंभाचे आयोजन केले जाऊ लागले. प्रारंभी विविध क्रीडा संघटना आणि क्रीडाप्रेमींनी या प्रकाराला जोरदार विरोध केला. तथापि या क्रीडांगणावरील सभा-समारंभ आणि कार्यक्रमांचे आयोजन कांही थांबले नाही. यात भर म्हणून या मैदानाच्या देखभालीकडे देखील साफ दुर्लक्ष होत असल्यामुळे मैदानाची वाताहत होण्यास सुरुवात झाली. अलीकडेच जिल्हा क्रीडांगणावर एका राजकिय नेत्याचा कार्यक्रम झाला होता.
या सोहळ्यामुळे तर मैदानाचे आणखीनच नुकसान झाले आहे. सध्या या मैदानावर मोठ्या प्रमाणात खाचखळगे पडण्याबरोबरच लाखो रुपये खर्चून बसविण्यात आलेल्या सिंथेटिक ट्रॅकची अक्षरशा लक्तरे निघाली आहेत. ठिकठिकाणी हा ट्रॅक उखडण्याबरोबरच त्यावर मधोमध बऱ्याच ठिकाणी खड्डेही पडले आहेत. जिल्हा क्रीडांगणावर सराव केलेल्या अनेक क्रीडापटूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर बेळगावचा नावलौकिक वाढविला आहे. ही वस्तुस्थिती असूनही या क्रीडांगणाचा जास्तीत जास्त विकास करण्याऐवजी क्रीडांगणाची दुरवस्था करण्यावरच अधिक भर दिला जात असल्यामुळे क्रीडापटूंमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मैदान खराब झाल्यामुळे त्या क्रीडांगणावर सरावासाठी येणाऱ्या क्रीडापटूंची संख्या देखील मोठ्या प्रमाणात घटली आहे. जिल्हा क्रिडांगणा व्यतिरिक्त शहरातील क्रीडापटू सीपीएड कॉलेज मैदानावर सराव करणे पसंत करतात. मात्र त्या मैदानावरही सातत्याने विविध कार्यक्रम, फेस्टिव्हल्सचे आयोजन करून मैदानाची दुर्दशा करण्यात येत असल्यामुळे सराव करायचा तरी कोठे? असा प्रश्न क्रीडापटू आणि त्यांच्या प्रशिक्षकांना पडला आहे. शहरातील प्रमुख मैदान ही खरंतर फक्त खेळासाठीच वापरली गेली पाहिजेत अन्यथा बेळगावच्या क्रीडा क्षेत्राचा ऱ्हास होण्यास फारसा वेळ लागणार नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे.
तरी क्रीडा खात्याचे मंत्री स्थानिक लोकप्रतिनिधी आणि क्रीडा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन युद्धपातळीवर योग्य ती कार्यवाही करावी. सर्वप्रथम किमान जिल्हा क्रीडांगणावर सार्वजनिक कार्यक्रम अथवा सभा-समारंभ आयोजनास कडक निर्बंध घालण्यात यावेत. तसेच या क्रीडांगणाचे मैदान आणि तेथील सिंथेटिक ट्रॅक पूर्ववत करण्याबरोबरच त्याची व्यवस्थित देखभाल ठेवली जाईल याची काळजी घ्यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.