बेळगाव शहरातील सदाशिवनगर स्मशानभूमी ही लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी आहे की महापालिकेची वाहने पार्किंग करण्यासाठी आहे? असा संतप्त सवालसमाज सेवक आणि माजी महापौर विजय मोरे यांनी केला आहे.
शहराची प्रमुख स्मशानभूमी असलेल्या सदाशिवनगर स्मशानभूमीत गेल्या 30 वर्षांमध्ये वेगवेगळ्या संघटनांमार्फत लोकवर्गणीतून विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत. मात्र आता सदाशिवनगर स्मशानभूमीत मृत व्यक्ती ही आश्चर्याने जिवंत होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी असलेल्या या स्मशानभूमीत सध्या महापालिकेची टँकर्स, ट्रॅक्टर -ट्रेलर, रुग्णवाहिका यासह मोठ्या संख्येने शहरातील कचरा वाहू वाहने पार्क केलेली पहावयास मिळत आहेत. त्यामुळे या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना ही स्मशानभूमी आहे की पार्किंगची जागा? असा प्रश्न पडू लागला आहे.
सदर स्मशानभूमीत एका बाजूला आधीच भंगारात काढलेली ट्रक, कार, रोड रोलर आदी वाहने तर दुसरीकडे स्मशानभूमीतील इमारती शेजारी गंजके फुटके लोखंडी कचराकुंड व अन्य टाकाऊ साहित्य धुळखात पडून आहे.
पार्क केलेल्या उपरोक्त अवजड वाहनांची ये -जा असल्यामुळे स्मशानभूमीतील चांगल्या काँक्रीटच्या रस्त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अवजड वाहनांमुळे या सिमेंट रस्त्या शेजारील जमीन खचून त्या ठिकाणी सध्या चिखल निर्माण होण्याबरोबरच गढूळ पाणी साचून राहिले आहे. परिणामी अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
याची सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे यांनी गंभीर दखल घेतली असून ही स्मशानभूमी आहे की पार्किंगची जागा? असा संतप्त सवाल केला आहे. त्याचबरोबर येत्या 8 दिवसात सदाशिवनगर स्मशानभूमीत पार्क केलेली वाहने तेथून हटवली जावीत, अन्यथा आपण आपल्या परीने त्यावर उपाय काढू असा इशारा माजी महापौर मोरे यांनी दिला आहे.