बेळगाव शहराच्या आसपासच्या प्रदेशातील शिवारांमध्ये असलेल्या भात पिकांवर सध्या मावा रोगाचे संकट कोसळल्यामुळे बासमती, इंद्रायणी वगैरे भात पिके धोक्यात आली आहेत. याची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने या शिवारांमध्ये मावा रोग प्रतिबंधक हवाई औषध फवारणी करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
बेळगाव शहर तसेच परिसरातील अनगोळ, मजगाव, मच्छे, येळ्ळूर, शहापूर, वडगाव, जूने बेळगाव, धामणे, हालगा, बेळगावसह इतर शिवारातील बासमती, इंद्रायणीसह इतर भात पिकांच्या कापणीला 8 -15 दिवस उरले असताना हवामान फरकाने मोठ्या प्रमाणात मावा रोगाचा प्रादुर्भाव होऊन तो झपाट्याने वाढत संपूर्ण भातपीकंच करपून जात आहे.
मावा रोगाचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव पाहता निसर्ग तोडंचा घासही हिरावून घेतो कि काय? अशी धास्ती शेतकऱ्यांना लागली आहे. आर्थिक परिस्थिती चांगली असलेले शेतकरी वेगवेगळी महागडी औषधं आणून आपल्या भात पिकावर फवारणी करत आहेत. तथापि ते प्रत्येकालाच जमते असे नाही. अलीकडच्या काळातील पुराच्या फटक्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे.
त्यामुळे अशा शेतकऱ्यांना मावा रोगाच्या संकटाला कसे तोंड द्यायचे? असा प्रश्न पडला आहे. आपल्याला परवडतील ती औषध आणून त्यांनी देखील पीकं वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र तरीही या रोगाचा झपाट्याने प्रादुर्भाव सुरूच आहे.
तरी कृषी खाते पर्यायाने प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन झपाट्याने वाढणाऱ्या या मावा लोगाला टाळा घालून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मागच्या वर्षी खानापूर तालूक्यात ज्या पद्धतीने पिकांवर हवाई औषध फवारणी करण्यात आली होती, तशी फवारणी तात्काळ शहर परिसरातील शिवारांमध्ये असलेल्या भात पिकांवर करावी, अशी जोरदार मागणी संकटग्रस्त भात उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.