लंबी स्कीम रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून खबरदारीचा उपाय म्हणून गुंजी (ता. खानापूर) येथील जागृत देवस्थान श्री माऊली देवी यात्रोत्सवात विजयादशमीच्या मुहूर्तावर मंदिरा सभोवती मानाच्या बैलजोड्या पळविण्याच्या सोहळ्यावर यंदा बंदी घालण्यात आली आहे.
जिल्ह्यातील स्किन रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी गेल्या 5 सप्टेंबर रोजी जनावरांच्या बाजारासह शर्यतीचे आयोजन आणि जनावरे एकत्र आणण्यावर जिल्ह्यात बंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश यात्रांनाही लागू असून गुंजीच्या श्री माऊली देवी यात्रेत त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना ग्रा. पं. विकास अधिकारी प्रीती पत्तार यांनी देवस्थान व यात्रोत्सव कमिटीला एका पत्राद्वारे केली आहे.
गुंजी येथील जागृत देवस्थान श्री माऊली देवीच्या यात्रा उत्सवात विजयादशमीच्या मुहूर्तावर मंदिरासभोवती मानाच्या बैल जोड्या पळवण्याची प्रथा आहे. या सोहळ्यात माऊली देवीच्या अखत्यारीतील सर्व गावांचे शेतकरी व भावीक बैलजोड्यांसह सहभागी होत असल्यामुळे या सोहळ्याला वेगळे महत्त्व आहे. मात्र वेगाने फैलावणाऱ्या लंपी रोगामुळे यावर्षी या सोहळ्यावर अनिश्चिततेचे सावट पसरले आहे.
दरम्यान, लंपी स्कीन रोगाची लागण झाल्याचा अद्याप एकही प्रकार खानापूर तालुक्यात निदर्शनास आलेला नाही. शेतकरी तसेच पशु संगोपन खात्याकडून जनावरांना लंपीची लागण होऊ नये यासाठी सर्वती खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे यात्रेतील महत्त्वाचा कार्यक्रम असलेल्या बैलजोड्या पळवण्याच्या सोहळ्याला बंदी आदेशातून सवलत देण्यात येईल यावी, अशी मागणी भाविकातून केली जात आहे.
तथापि आदेशाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाने देखील कंबर कसल्यामुळे अनेक वर्षाची परंपरा असलेल्या विजयादशमीच्या मुहूर्तावरील श्री माऊली मंदिरा सभोवती मानाच्या बैलजोड्या पळविण्याच्या सोहळ्याला यावेळी देवस्थान व यात्रा कमिटी फाटा देण्याची दाट शक्यता आहे.