रविवारी मराठा मंदिर येथे विविध समिती नेत्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत काळादिन, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नव्या कार्यकारिणीची निवड, समिती बळकटीकरण यासह इतर महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
रेल्वे ओव्हर ब्रिज येथील मराठा मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्या व्यासपीठावर माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, तालुका म. ए. समिती युवा अध्यक्ष संतोष मंडलिक, जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, एम जी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीत माजी आमदार मनोहर किणेकर बोलताना म्हणाले, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नव्या कार्यकारिणीची निवड होणार आहे. यासाठी गावपातळीवर बैठक घेऊन प्रत्येक गावातील इच्छुकांच्या नावांची यादी पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावी. १०० ते १२५ सदस्यांची कार्यकारिणी ठरविण्यात येणार असून सुकाणू समितीची निवड स्वतंत्ररित्या करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. नव्या सदस्यांना बैठकीला बोलावून एकी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी मनोहर किणेकर यांनी केले. यावेळी १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्यादिनासंदर्भातही विचार व्यक्त केले. १२ ऑक्टोबर पासून गावोगावी जनजागृती करण्यात येणार असून तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीला बळकट करण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखविला.
युवा समिती अध्यक्ष संतोष मंडलिक बोलताना म्हणाले, १ नोव्हेंबर रोजी गांभीर्याने काळा दिन पाळण्यात यावा. यासाठी गावपातळीवर जनजागृती व्हावी. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये सुरु असलेले गटातटाचे राजकारण बाजूला सारून एकी करावी. जर दुर्गा माता दौड आणि एक नोव्हेंबर रोजी हजारो तरुण एकसंघ होऊ शकतात तर निवडणुकीत या तरुणांची संख्या कुठे जाते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुर्गामाता दौड ही शिवरायांच्या विचारधारेशी निगडित आहे तर महाराष्ट्र एकीकरण समितीची विचारधारा वेगळी आहे का? असा सवालदेखील संतोष मंडलिक यांनी उपस्थित केला. समिती एकसंघ करण्यासाठी आणि समितीला बळकटी आणण्यासाठी युवकांना सामावून घेणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सुचविले.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील बोलताना म्हणाल्या, कर्नाटक सरकारने कन्नड सक्ती कायदा अंमलात आणण्याचा विचार सुरु केला असून याचा आपण निषेध करत आहोत. सीमाभागातील मराठी भाषिकांनी मराठी भाषेसाठी एकी करणे, मराठी भाषा संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीत तालुक्यातील चार विविध कुस्तीपटूंचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला आर. के. पाटील, बी. डी. मोहनगेकर, आर. एम. चौगुले, दत्ता उघाडे, राजू किणेकर, चेतन पाटील आदींसह मोठ्या संख्येने समिती कार्यकर्ते उपस्थित होते.