केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो या घटनेतून बचावला आहे कारण मांजा गळ्यात अडकून त्याचा गळा चिरला गेला असता मात्र नशिबाची साथ म्हणून तो केवळ जखमी झाला आहे.
आपल्या पत्नी सोबत दुचाकीवरून जाणाऱ्या युवकाच्या गळ्याला पतंगाचा मांजा दोरा लागून युवक जखमी झाल्याची घटना आज रविवारी सकाळी 10:30 च्या दरम्यान न्यु गांधीनगर हायवेवर घडली.दुचाकीवर सोबत असलेल्या पत्नीला मात्र कोणतीही इजा झाली नाही.
जोतिबा निंगानी हणमंताचे (वय 42, रा. हलगा बेळगाव) असे मांजामुळे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. जोतिबा हे नेहमीप्रमाणे हायवेवरून हलग्याहून बेळगावकडे येत असताना न्यू गांधीनगर जवळील ओव्हर ब्रिजवर अचानक पतंगाचा तुटलेला मांजा गळ्यात अडकुन त्यांना गंभीर दुखापत झाली.
मिळालेल्या माहितीनुसार मांजामुळे ज्योतिबांच्या गळ्याला झालेल्या जखमीतून रक्तस्त्राव सुरू होता. त्यामुळे त्यांना तात्काळ खाजगी इस्पितळाला दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. केवळ दैव बलवत्तर म्हणून या घटनेत ज्योतिबांच्या गळ्याला खोलवर जखम न होता त्यांचा जीव वाचला.
दरवर्षी मांजा गळ्यात अडकून बेळगाव शहरात अनेक जणांना इजा दुखापत होतच असते. मात्र या जीवघेण्या धोकादायक मांजावर अद्याप बेळगावात बंदी घातण्यात आलेली नाही. त्यामुळे दुचाकी स्वारांनी देखील काळजीपूर्वक गाडी चालवणे गरजेचे बनले आहे.
धोकादायक मांजामुळे केवळ पशुपक्षीच नव्हे तर मनुष्यालाही धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये मांज्यावर निर्बंध घालणे अत्यावश्यक बनले आहे.