बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव शहर आणि परिसरात पतंग उडविण्याची हौस जीवघेणी ठरत आहे. पतंगबाजीमुळे अनेकांचे जीव धोक्यात येत चालल्याच्या घटना वाढत आहेत. या साऱ्या गोष्टींसाठी केवळ पतंग नाही तर पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा धोकादायक मांजा देखील जबाबदार ठरत आहे.
पतंगाच्या मांजामुळे जीवावर भेटण्याच्या घटनेत वाढ होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने मांजा विक्रीवर बंदी घातली. परंतु आजही तरुणांकडून मांजाचा वापर राजरोसपणे सुरु आहे. कधी उड्डाणपूल, तर कधी झाडांच्या फांद्या तर कधी आणखी काय.. अनेक ठिकाणी मांजाची शिकार वाहनचालक तर कधी पादचारी ठरत आहेत.
इतकेच नाही तर पतंग उडविण्याचे वेड कधी कधी पतंग उडविणाऱ्याच्याच जीवावर बेतणारे ठरत आहे. मागील २ वर्षात पतंग आणि पतंगाशी संबंधित घडलेल्या अनुचित घडणांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गुरुवारीदेखील शहरात सुट्टी साजरी करण्यासाठी नातेवाईकांच्या घरात गेलेल्या एका चिमुरड्याचा पतंगामुळेच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
काच, रसायने, आणि इतर धोकादायक साहित्याचा वापर करून बनविण्यात येणारा मांजा आणि या मांजाच्या माध्यमातून पतंग उंचच्या उंच उडविण्यासाठी मुलांची सुरु असलेली धावपळ, आपल्या जीवाची पर्वा न करता बिनदिक्कतपणे उंचावर जाऊन पतंग उडविण्याची इच्छा मुलांमध्ये असते. चांगले-वाईट याचा विचार न करता लहान मुले खेळायच्या नादात कोणत्याही टोकाला जाऊन पोहोचू शकतात.
अलीकडे पतंग उडविण्याच्या नादात अनेक लहान मुले जोरात पळत सुटतात. एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत पतंगाच्या मागून सुसाट धावत जाताना दिसतात. रस्त्यावरून धावणारी वाहने, खड्डे किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता वेगाने धावतात. पतंग उडविण्यासाठी प्रामुख्याने मांजाचाच विचार करतात. परंतु हाच मांजा दुखापत होण्याचे प्रमुख कारणही बनत चालले आहे.
पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या मांजामुळे केवळ माणसेच नाही तर पक्षीदेखील मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना घडत आहेत. शिवाय हा मांजा विघटित होत नसल्याने प्रदूषणाचेही कारण बनत चालले आहे. प्रशासनाने बंदी घालूनही अशा जीवघेण्या मांजाचा खेळ तरुणाईला का करायचा आहे? हाच प्रश्न उपस्थित होत आहे. पतंग आणि पतंगाच्या मांजामुळे वाढत चाललेल्या अनुचित घटनांची जबाबदारी केवळ प्रशासनानेच नाही तर पतंग उडविणाऱ्या प्रत्येकाने, आणि पतंग उडविण्यासाठी आपल्या मुलांना पाठविणाऱ्या पालकांचीही आहे. अशा मांजामुळे होणारे अनुचित प्रकार रोखण्यासाठी, पतंग उडविताना साध्या दोऱ्याचा वापर करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा आपली हौस इतरांच्या जीवावर बेतेल, यात शंका नाही.
तीन वर्षे जुनी बेळगावची खालील बातमी वाचा