खानापूर तालुक्यातील कुसमळी -जांबोटी रस्त्याची विशेष करून रेड हिल हॉटेल ओलांडल्यानंतर येणाऱ्या ब्रिज वरील रस्त्याची मोठ्या प्रमाणात खड्डे पडून दुर्दशा झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून सदर रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.
कुसमळी -जांबोटी हा रस्ता मोठ्या रहदारीचा आहे. या रस्त्याची अलीकडच्या काळात दुरवस्था झाली असून त्यावर शेकडो खड्डे पडले आहेत. खास करून रेड हिल हॉटेल ओलांडल्यानंतर येणाऱ्या ब्रिजच्या रस्त्याची अत्यंत वाताहात झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खाचखळगे पडले आहेत.
याचा ट्रक वगैरे सारख्या अवजड वाहनांवर कांही परिणाम होत नसला तरी कार गाड्यांसारख्या चार चाकी आणि दुचाकी वाहन चालकांसाठी सदर रस्ता अत्यंत त्रासदायक ठरत आहे. कुसमळी -जांबोटी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. गोव्यातून बेळगावला ये -जा करण्यासाठी हा रस्ता सोयीचा असल्यामुळे प्रवासी वाहनांसह भाजीपाला व इतर मालवाहू वाहनांची या रस्त्यावर कायम वर्दळ असते.
मोठ्या प्रमाणात रहदारी असतानाही कुसमळी -जांबोटी रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी अलीकडच्या काळात सदर रस्त्यावर असंख्य खड्डे पडून तो वाहतुकीस प्रतिकूल ठरत आहे. रेड हिल हॉटेल ओलांडल्यानंतर येणाऱ्या ब्रिजवरील रस्ता तर अपघात प्रवण क्षेत्र बनला आहे. खड्ड्यांमुळे वाहने काळजीपूर्वक संथगतीने हाकावे लागत असल्यामुळे या ब्रिजच्या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तसेच वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकार ही घडत आहेत. त्यामुळे ब्रिजचा रस्ता ओलांडताना वाहनचालक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या नावे लाखोल्या तर वाहतच आहेत शिवाय रस्त्याच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केले जात असल्याने आसपासच्या गावातील ग्रामस्थांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अलीकडे बेळगावच्या माजी महापौर सरिता पाटील यांनी ब्रिजवरील रस्त्याच्या डागडुजीचा विचार केला होता. मात्र मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे नाईलाजाने त्यांना तो विचार बाजूला सारावा लागला.
तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी विशेष करून खानापूरच्या आमदार डाॅ. अंजलीताई निंबाळकर यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर रस्त्याची किमान संबंधित ब्रिजवरील मार्गाची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी वाहन चालक, प्रवासी तसेच परिसरातील गावकऱ्यांकडून केली जात आहे.